Kulgaon Badlapur Municipal Council Encroachment Campaign: उच्च न्यायालयात एका रीट याचिकेतील सुनावणीदरम्यान कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील अनधिकृत बांधकांमांवर न्यायालयाने परखड मत व्यक्त केले होते. त्यानंतर सोमवारी कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासनाने शहरातील अनधिकृत बांधकांमांवर धडक कारवाई केली. सायंकाळपर्यंत ४० हून अधिक बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली होती. तर याकामी जवळपास पूर्ण पालिका पालिका प्रशासन रस्त्यावर उतरलेले दिसले. कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकांमांमध्ये नामांकीत हॉटेल, धाबे, उपहारगृह, वाहन विक्रीची दुकाने यांचा समावेश आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नामांकीत कंपन्यांचा कारभारही अनधिकृत वास्तूंमधूनच सुरू असल्याचे समोर आले आहे.
कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान बदलापूर शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न चर्चेला आला. त्यावरून नगर परिषद प्रशासनाला न्यायालयाने फटकारले. शहरात तब्बल ४३८ अनधिकृत बांधकामे असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली होती. या बांधकामांची यादी जाहीर करण्याचे आदेश उच्च न्यायलयाने दिले होते. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर ही यादी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी परिषदेने वृत्तपत्रांच्या माध्यमातून जाहीर केली. प्रशासनाच्या वतीने ही अनधिकृत बांधकामे बांधकाम करणाऱ्याने हटवावे असे आवाहन करण्यात आले होते. मात्र दोन महिन्यांनंतरही ही बांधकामे हटली नाहीत.
त्यामुळे सोमवारी कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासनाने अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू केली. सोमवारी सकाळच्या सुमारास बदलापूर पूर्वेतील कर्जत रस्ता आणि प्रस्तावित पनवेल मार्गावर पालिकेचे कर्मचारी, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक आणि जेसीबी यंत्रणा फिरताना दिसत होती. त्यानंतर अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. आज कारवाई होणारच याची चाहूल लागताच सर्व दुकानदार, हॉटेलधारक, कंपन्यांचे लोक बांधकामातील साहित्य, माल काढू लागले. त्या कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
कार्मेल शाळेसमोरच्या परिसरातून या कारवाईला सुरूवात करण्यात आली. एक पथक कर्जत राज्यमार्गावर तर दुसरे पथक प्रस्तावित पनवेल मार्गावर कारवाई करत होते. या कारवाईत अनेक हॉटेल, उपहारगृह, धाबे, कार, दुचाकीची दुकाने, टपऱ्या जमिनदोस्त करण्यात आली. यावेळी अनेकांनी कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. काहींनी नोटीस नसल्याचे कारण देत कारवाई करता येणार नाही अशी सबब मांडली. मात्र प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यातील नोटीशीचा दाखल देत कारवाई सुरूच ठेवली. सायंकाळपर्यंत ४० हून अधिक बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
प्रतिक्रियाः न्यायालयाच्या आदेशानुसार सदर कारवाई सुरू करण्यात आली आहे. दोन पथकांमध्ये १०० हून अधिक कर्मचारी, पोलीस, सुरक्षा मंडळाचे कर्मचारी आणि यंत्रांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यापुढेही सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे. शहरातील ४३८ बांधकामे हटवली जातील. – मारूती गायकवाड, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगर परिषद.
नामांकीत कंपन्यांचेही बांधकाम अनधिकृत
बदलापूर शहराच्या पूर्व भागात कर्जत रस्त्यावर अनेक वाहन विक्रीची नामांकीत कंपन्यांची दुकाने आहेत. मात्र काचेची आणि आकर्षक ही दुकानेही अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे नामांकीत कंपन्यांना याची माहिती नव्हती की स्थानिक संस्थेने त्यांना याबाबत कल्पना दिली नव्हती असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या कंपन्यांना या कारवाईचा मोठा फटका बसणार आहे.

