बदलापूरः कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सांडपाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात सुरू असलेल्या एका खटल्याच्या निमित्ताने बदलापूर शहरातील अतिक्रमणांचा विळखा किती घट्ट आहे हे समोर आले आहे. शहरात दोन महिन्यांपूर्वी पालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीनुसार ४३८ अनधिकृत बांधकामे आहेत. मात्र त्यानंतर आणि अर्धवट झालेल्या सर्वेक्षणामुळे आणखी अनेक बांधकामे यादीत येण्यापासून राहिल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे सुरूवातीला करोनाचे सावट आणि नंतर प्रशासकीय राजवटीत ही अनधिकृत बांधकामे वाढल्याचे समोर आले आहे. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी पालिकेने या ब बांधकामांवर कारवाई केली. पुढचे अनेक दिवस ही कारवाई सुरू ठेवावी लागणार आहे.
गेल्या काही वर्षात बदलापूर शहर वेगाने विस्तारले आहे. मोठ्या प्रमाणावर उभ्या राहिलेल्या रहिवाशी संकुलांमुळे पर्यायाने अनेक दुकाने, गाळे, बाजार उभे राहिले. उपहारगृह, हॉटेल्सही पर्यायानेच उभ्या राहिल्या. मात्र या सर्व वास्तू किंवा बांधकामे उभी होत असताना परवानगी घेतली गेली नव्हती. त्यातच २०२० वर्षाच्या सुरूवातीलाच करोनाचे संकट वाढत गेले. याच काळात कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपून प्रशासकीय राजवट सुरू झाली. याच राजवटीत रस्तोरस्ती, गल्लोगल्ली दुकाने, खाद्यपदार्थ विक्री, भाजी किंवा मिळेल ती दुकाने सुरू झाली. मात्र सर्व सुरळीत होईपर्यंत माणुसकीच्या नात्याने या बांधकामे, दुकाने यांच्याकडे कानाडोळा करण्यात आला. मात्र त्यानंतर यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. ते होऊ शकले नाही.
याच काळात बदलापुरातील कर्जत राज्यमार्गाचे झालेले रूंदीकरण आणि शेजारच्या प्रस्तावित पनवेल महामार्गाच्या कामाला गती आली. जवाहरलाल नेहरू न्यास ते बडोदे मार्गाचे कामही वेगाने सुरू झाल्याने येथे रहिवासी संकुले आली. त्यामुळे या परिसरात बँकाचे वाढलेले जाळे, हॉटेल्स, चार चाकी, दुचाकी शोरूमची स्पर्धा, खाद्य पदार्थ, कपडे, दागिने यांच्या नामांकित ब्रँडचा प्रवेश यामुळे शहराचे रूप पालटले. मात्र याच काळात अतिक्रमणांचा आणि अनधिकृत बांधकामांचा मात्र विळखा शहराला पडल्याचे दिसून आले.
यादीत सारेच
कुळगाव बदलापूर नगर परिषदेने जाहीर केलेल्या अनधिकृत बांधकामांच्या यादीत चक्क पेट्रोल पंप, दवाखाने, नामांकीत कंपन्यांचे शोरूम, वाहन विक्री कंपन्यांची दुकाने तसेच माजी नगरसेवकांची दुकानेही असल्याचे समोर आले आहे. ४३८ अनधिकृत बांधकामाच्या या यादीत उपहारगृह, रसवंती, पान टपऱ्या, पोळी भाजी केंद्र, किराणा दुकाने, पिठाच्या गिरण्या, वाहन धुलाई दुकान, गॅरेज, चायनिज, सुपर मार्केट, झेरॉक्स दुकान, मास मासळी विक्रीचे दुकान, घाऊक भाजी बाजार, सभागृह,
दुकानांचे गाळे, सोसायटीच्या कार्यालयाचे बांधकाम, बेकऱ्या, कुरिअर कार्यालय, मोबाईल दुकान, रुग्णालय, इमारतींचे काही मजले, सलून, ढाबे, एका माजी नगरसेवकाचे वॉशिंग सेंटर, ऑटो पार्टस व सिमेंटचे दुकान अशा बांधकामांचा समावेश आहे.
अनधिकृत बांधकामांचा आकडा वाढणार
नगर परिषदेकडून सुरू करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम सर्वेक्षणाचे काम निवडणुकीच्या कामांमुळे मागे पडल्याची माहिती आहे. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षण झाल्यास अनधिकृत बांधकामांचा आकडा ४३८ वर जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

