बदलापूर: बदलापूर पश्चिमेतील एका गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासात मोठा आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. क्षमतेपेक्षा अधिक मजल्यांचा बेकायदेशीर आराखडा सादर करणारा स्थापत्य अभियंता आणि जागेची कोणतीही पाहणी न करता त्या चुकीच्या आराखड्याला बेकायदेशीरपणे मंजुरी देणारे कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचे तत्कालीन नगररचनाकार या दोघांविरुद्ध बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्यामुळे पुनर्विकासासाठी गेलेली संपूर्ण ९ मजली इमारतच अनधिकृत ठरली असून, सोसायटीच्या रहिवाशांची मोठी फसवणूक झाली आहे.

बदलापूर पश्चिमेतील सोनवली परिसरात प्रेमकुंज कोऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटी आहे. या सोसायटीचे अध्यक्ष विनोद बबन मिरकुटे यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या सोसायटीने आपली जुनी इमारत पुनर्विकासासाठी दिली होती. या पुनर्विकास प्रकल्पासाठी अंबरनाथ पूर्व येथील रहिवासी असलेले प्रमोद विष्णू पाटील यांची स्थापत्य अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पाटील यांनी बदलापूर नगरपरिषदेत वास्तुविशारद म्हणून स्वतःची नोंदणी केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वास्तुविशारद प्रमोद पाटील यांना नगरपरिषदेच्या नियमांनुसार केवळ ५०० चौरस मीटर भूखंड क्षेत्रफळ, ३ मजले किंवा ११ मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींना मंजुरी देण्याचा अधिकार होता. मात्र, त्यांनी अधिकाराचे उल्लंघन करत चक्क ९ मजली इमारतीचा सुधारित आराखडा बेकायदेशीरपणे नगरपरिषदेत सादर केला, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावेळी त्यांनी हा सुधारित आराखडा सादर केला, तेव्हा त्यांच्याकडे कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचा कोणताही अधिकृत परवाना शिल्लक नव्हता. तरीही त्यांनी हा आराखडा मंजूर करून घेतला, असाही आरोप तक्रारीत आहे.

या प्रकरणात कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचे तत्कालीन नगररचनाकार विवेक गौतम यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात बसूनच, प्रत्यक्ष जागेवर जाऊन कोणतेही स्थळपाहणी न करता, प्रमोद पाटील यांनी सादर केलेल्या या चुकीच्या आणि बेकायदेशीर ९ मजली आराखड्याला बांधकाम परवानगी दिली, असा आरोप तक्रारीत केला आहे. या दोघांच्या संगनमतामुळे इमारतीत ५ सदनिका आणि ५ खोल्या अनधिकृतपणे बांधण्यात आल्या. परवाना नसलेल्या वास्तुविशारदने केलेला आराखडा आणि तत्कालीन नगररचनाकाराने दिलेली चुकीची मंजुरी यामुळे ही संपूर्ण इमारतच आता अनधिकृत ठरली आहे. सोसायटीच्या रहिवाशांची मोठी आर्थिक आणि मानसिक फसवणूक झाल्याने, अखेर अध्यक्ष विनोद मिरकुटे यांनी पोलिसांत धाव घेतली.

याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी १९ ऑक्टोबर २०१८ ते ९ मे २०२५ या कालावधीत घडलेल्या या फसवणुकीप्रकरणी वास्तुविशारद प्रमोद पाटील आणि तत्कालीन नगररचनाकार विवेक गौतम या दोघांविरुद्ध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामुळे पालिका वर्तुळात आणि बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.