बदलापूर : टिटवाळा येथून देवदर्शन करून घरी परतणाऱ्या माय-लेकाला गुगल नकाशावर दाखवलेला मार्ग थेट मृत्यूच्या दारात घेऊन गेल्याची घटना समोर आली आहे. बदलापूर शहरातून जाणाऱ्या उरण बंदर ते बडोदे मार्गावरील जांभळे गावातील पुलावर असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे दुचाकीचा अपघात होऊन कल्याण येथील ५० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अरुणा कुलकर्णी असे या मृत महिलेचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कल्याण पश्चिम येथे राहणाऱ्या अरुणा कुलकर्णी २८ जून रोजी आपला मुलगा प्रतीक याच्यासोबत दुचाकीवरून टिटवाळा येथील गणपतीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन आटोपून रात्री साडे आठच्या सुमारास ते कल्याणकडे परतत होते. परतीच्या प्रवासासाठी प्रतीकने मोबाईलवर ऑनलाईन नकाशा सुरू केला. मात्र, जीपीएसने त्यांना नेहमीचा रस्ता न दाखवता बदलापूर जवळून जाणारा बडोदे महामार्ग दाखवला अशी माहिती आहे. बदलापूर जवळील जांभळे गावातून जाणारा पुलाचा मार्ग दाखवला. रात्रीची वेळ आणि रस्त्यावर पूर्णपणे अंधार असल्याने पुलावर असलेला मोठा खड्डा प्रतीकला शेवटच्या क्षणी दिसला. खड्ड्यापासून बचाव करण्यासाठी त्याने अचानक जोरात ब्रेक दाबला. यामुळे दुचाकीवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि मागे बसलेल्या अरुणा कुलकर्णी यांचा तोल जाऊन त्या रस्त्यावर पडल्या. या भीषण अपघातात अरुणा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपूर्ण रस्त्यामुळे घडला अनर्थ

जांभळे गावातून जाणारा हा रस्ता मुंबई- बडोदे महामार्ग असून त्याचे काम अद्याप सुरू आहे. हा मार्ग अधिकृतपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. तसेच या रस्त्यावर पथदिवे, दिशादर्शक फलक किंवा सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत. तरीही हा रस्ता तयार झाल्यासारखा दिसत असल्याने आणि अनेकदा ”जीपीएस” याच मार्गाचा जवळचा आणि वेगवान मार्ग दाखवत असल्याने अनेक अनभिज्ञ वाहनचालक या रस्त्याचा वापर करतात. यावर यापूर्वीही अपघात झाले आहेत. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.