बदलापूरः भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर बदलापूरच्या जांभळांना नवे बळ मिळाले असून, आता या फळाच्या संवर्धनासाठी स्वतंत्र जांभूळ आणि शहरी शेती संशोधन केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अंबरनाथ तालुक्यात या केंद्रासाठी योग्य जागेचा शोध सुरू असून, शासन पातळीवर प्राथमिक सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काही वर्षांपर्यंत संपलेले जांभूळ आख्यान नव्याने उभारी घेणार आहे.

वैशिष्ट्यपूर्ण चव, गडद रंग आणि औषधी गुणधर्मांमुळे ओळख असलेल्या बदलापूरच्या जांभळांना भौगोलिक मानांकन मिळाले. त्यानंतर बदलापूर आणि आसपासच्या भागातील शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टने जांभूळ संशोधन केंद्र स्थापनेसाठी पुढाकार घेतला आहे. राज्यात आंबा, फणस, काजू आदी फळांसाठी स्वतंत्र संशोधन केंद्रे असताना जांभूळसारख्या महत्त्वाच्या फळासाठी अद्याप केंद्र नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

कोकण पट्ट्यातील आंबा, फणस आणि काजूप्रमाणेच बदलापूरच्या जांभळांना देखील मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. विशेषत: मधुमेह नियंत्रणासह विविध आरोग्यदायी गुणधर्मांमुळे जांभळांची मागणी वाढत आहे. भौगोलिक मानांकनानंतर बदलापूर परिसरात जांभूळ लागवडीचे क्षेत्र वाढू लागले आहे. अशा वेळी स्थानिक पातळीवर संशोधन, रोपवाटिका विकास, प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धन यासाठी स्वतंत्र केंद्र उभारल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असा विश्वास ट्रस्टकडून व्यक्त करण्यात येत आहे.

यासंदर्भात कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, स्थानिक आमदार किसन कथोरे आणि ट्रस्टचे प्रतिनिधी आदित्य गोळे यांच्यात नुकतीच प्राथमिक चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून याविषयी सविस्तर माहिती मागविण्यात आली होती. आता अंबरनाथ तालुक्यात जांभूळ आणि शहरी शेती संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.

राज्य शासनाने या प्रस्तावाला तत्त्वतः हिरवा कंदील दिल्याचे समजते. देशातील जांभूळ आणि शहरी शेती या दोन्ही संकल्पनांना एकत्र आणणारे हे पहिलेच संशोधन केंद्र ठरण्याची शक्यता आहे. प्राथमिक टप्प्यात केंद्रासाठी योग्य जागेचा शोध सुरू करण्यात आला असून, तहसीलदार कार्यालयामार्फत विविध ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. दरम्यान, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू लवकरच बदलापूरचा दौरा करणार असून, प्रस्तावित जागांची पाहणी करून पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. बदलापूरच्या जांभळांच्या माध्यमातून स्थानिक शेतीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रियाः जांभूळ संशोधन केंद्रासाठी योग्य ठरतील अशा काही जागा पाहिल्या आहेत. त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाला पाठविण्यात येईल – अमित पुरी, तहसीलदार अंबरनाथ.