बदलापूरः बदलापूर शहरातून जाणाऱ्या जवाहरलाल नेहरू बंदर न्यास ते बडोदे या द्रुतगती महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असतानाच या मार्गाचा शहरांतर्गत वाहतुकीसाठी वापर केला जातो आहे. याच महामार्गावर बदलापुरजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. यात एक चारचाकी कार थेट महामार्गावरून खाली पडली. तर एक कार रस्त्यावर अपघातग्रस्त झाली. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही जण जखमी झाल्याची माहिती आहे.
जवाहरलाल नेहरू बंदर ते बडोदे हा द्रुतगती महामार्ग सध्या अंतिम टप्प्यात आहे. बदलापुरजवळ बोगद्यातून येणारा हा मार्ग कल्याण तालुक्यातील रायते, टिटवाळा मार्गे थेट भिवंडीपर्यंत जातो. येथे समृद्धी महामार्गाला हा मार्ग जोडण्यात आला आहे. बदलापूर शहरात या मार्गावर जाण्यासाठी जोडणी देण्यात आली आहे. मात्र या मार्गाचे काम विविध ठिकाणी रखडलेले आहे. तरीही उपलब्ध मार्ग मोठा असून त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसात या मार्गावर दुचाकीस्वारांच्या अनेक स्पर्धा पाहायला मिळाल्या. दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालक बेदरकारपणे या मार्गावरून वाहने हाकतात. त्यामुळे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही धोका निर्माण होतो. सध्या बदलापूर शहरातून एरंजाड गावाजवळून या मार्गावर जाता येते. पुढे राहटोलीजवळही या मार्गावर जाता येते. त्यामुळे बदलापूरहून पनवेल, टिटवाळा, गोवेली, रायते असा प्रवास करण्यासाठीही या मार्गाचा वापर केला जातो आहे. अंतर्गत गावांमध्येही याच मार्गाने अनेक जण प्रवास करतात.
याच मार्गावर बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास दोन वाहनांचा अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत एक काळ्या रंगाची कार थेट मार्गावरून खाली येऊन पडली. या गाडीत तीन प्रवासी पाहिल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. तर दुसरी कार महामार्गावरच सुरक्षा दुभाजकाला धडकली. या वाहनात सुरक्षा एयरबॅग उघडल्याने प्रवासी सुखरूप असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या मार्गावर नेमका अपघात कसा झाला, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. अपघातानंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
या अपघातानंतर या मार्गाचा अनधिकृत प्रवेश बंद केला जाण्याची शक्यता आहे. त्याचा फटका आसपासच्या गावातील स्थानिकांना बसू शकतो. या अपघाताच्या माहितीनंतर आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

