बदलापूर: रायगड आणि पुणे जिल्ह्यांच्या हद्दीत पसरलेल्या बोरघाट आणि सह्याद्रीच्या रांगांमध्ये झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहर आणि कल्याण तालुक्याला पुन्हा एकदा मोठ्या पूरस्थितीच्या गर्तेत ढकलले आहे. घाटमाथ्यावर झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत अत्यंत वेगवान आणि अनपेक्षित वाढ झाली. बदलापूर शहरात नदीने ६ जुलै रोजी दुपारी ३ वाजताच १७.५० मीटरची धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे शहरात पूरस्थितीचे चित्र होते.

उल्हास नदीचा उगम असलेल्या घाटमाथ्यावरील मुख्य पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळाले. नदीचा मुख्य स्त्रोत असलेल्या लोणावळ्यात तब्बल ६७० मिलीमीटर आणि खंडाळा येथे ५७६ मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी केलेल्या नोंदीनुसार ही विक्रमी नोंद आहे. या डोंगराळ भागातून येणाऱ्या पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे की, त्यामुळे संपूर्ण उल्हास खोऱ्यात जलद परिणाम जाणवले आणि खालच्या मैदानी भागात अवघ्या काही तासांतच पुराचे पाणी पसरले.

घाटमाथ्यावरील खोपोलीत ५१६ मिमी, माथेरानमध्ये ३३० मिमी, भीमाशंकरमध्ये ३१२ मिमी आणि कर्जतमध्ये ३०८ मिमी पावसाने अक्षरशः धुलाई केली. तर याच पट्ट्यात पुढे सावळे येथे २८७ मिमी, आहुपे २३८ मिमी, बदलापूर शहरात २१५ मिमी आणि नेरळमध्ये २०९ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे याच खंडाळा परिसरात सकाळी ८ वाजल्यापासून २२३ मिमी पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती अभिजित मोडक यांनी दिली आहे.

भौगोलिक रचनेमुळे ठाणे जिल्ह्याची धाकधूक वाढली

या पावसाचे आकडे पाहिले तर हे स्पष्ट होते की जरी बदलापूर शहरात प्रत्यक्ष पाऊस २१५ मिमी असला, तरी उंचावर असलेल्या रायगड आणि पुणे जिल्ह्यांच्या हद्दीतील डोंगराळ भागात झालेल्या ६०० मिलीमीटरपेक्षा जास्त पावसामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली. तिथून वाहून येणारे लाखो क्युसेक पाणी वेगाने बदलापूरच्या दिशेने येत असल्याने येथील पाणीपातळी सातत्याने वाढत गेली. दुपारी ३ वाजता धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर सायंकाळी ४ वाजेपर्यंत नदीचे पात्र १७.५७ मीटरवर पोहोचले होते.

या वाढत्या पाणीपातळीमुळे बदलापूर शहरात आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरली होती. अनेक रहिवाशांनी तात्काळ पावले उचलत आपल्या गाड्या पार्किंगमधून काढून शहरातील सुरक्षित व उंच ठिकाणी उभ्या केल्या. तर सखल भागातील आणि इमारतींच्या तळमजल्यावरील रहिवाशांनी वरच्या मजल्यांवर स्थलांतर केले होते.

घाटमाथ्यावरील पाऊस अद्यापही थांबलेला नसल्याने नदीच्या पाणीपातळीत पुढील काही तास मोठे चढ-उतार पाहायला मिळू शकतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बदलापूरपासून खालच्या दिशेने येणाऱ्या कल्याण ग्रामीण आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सखल भागांतील नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन यंत्रणांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.