बदलापूरः गतीमान प्रवासासाठी द्रुतगती महामार्गांची उभारणी करण्यावर सरकारचा भर असला तरी त्या द्रुतगती महामार्गावर नियंत्रण राखण्यात वाहनचालकांना अपयश येत आहे. त्यातूनच गेल्या काही दिवसात जवाहरलाल नेहरू न्यास ते बडोदे, कल्याण अहिल्यानगर या मार्गांवर वाहनांचे अपघात होत आहेत. विशेष म्हणजे या महामार्गांचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. तरीही होत असलेल्या या अपघातांमुळे वाहतूक व्यवस्थापन संस्थांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महामार्गांचे काम प्रगतीपथावर आहे. त्यातही अंबरनाथ, कल्याण, मुरबाड तालुक्यात सुरू असलेल्या महामार्गांच्या कामामुळे येथील वाहतूक मार्गात मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. बदलापूर शहराच्या वेशीवरून जाणाऱ्या जवाहरलाल नेहरू न्यास ते बडोदे मार्गामुळे बदलापूर शहराशी जोडल्या जाणाऱ्या ग्रामीण भागाचे मार्ग बदलले आहेत. त्यामुळे सध्या या महामार्गाचे काम जितके झाले आहे तितक्या मार्गावरून वाहनचालक प्रवास करताना दिसतात.

बदलापूर शहरातून रायते, गोवेली, मुरबाड, टिटवाळा जाण्यासाठी एरंजाड येथून वाहनचालक महामार्गावर येतात. मात्र या ठिकाणी वेगावर नियंत्रण राहत नसल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. गेल्या महिन्यात येथे दोन चारचाकींचा गुढरित्या अपघात झाला. ही वाहने स्पर्धा करत असल्याची चर्चा होती. त्यानंतर येथील शेजारच्या एका गावातील तीन तरूणी दुचाकीवरून जात असताना त्यांचे नियंत्रण सुटल्याने एक तरूणी थेट बारवी नदीच्या प्रवाहात पडल्याने तीचा मृत्यू झाला होता.

तर त्याच्या काही दिवसातच एक अवजड वाहन महामार्गात येणाऱ्या उच्चदाब वाहिनीच्या खांबावर जाऊन धडकला. दुसरीकडे कल्याण अहिल्यानगर महामार्गावरही अपघातांची मालिका सुरूच आहे. यात सोमवारी रायते येथील पुलावर अपघात झाला. त्यात ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी याच मार्गावर सरळगावजवळ एका तरूण आणि तरूणीचा दुचाकीवरून घसरून अपघात झाला. यात दोघांचाही मृत्यू झाला. त्यापूर्वी पाटगा येथीही अपघात झाला होता. सोमवारी याच मार्गावर एका रिक्षाचा भीषण अपघात झाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे या मार्गांच्या पूर्णत्वापूर्वीच मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याने चिंता वाढली आहे.