बदलापूरः बदलापूर ते कर्जत राज्य मार्गावर बदलापूर शहराच्या वेशीवर नाले बांधणीसाठी कंत्राटदाराने केलेल्या बेजबाबदार खोदकामामुळे वांगणी आणि आसपासच्या गावांना वीज पुरवठा करणाऱ्या विजवाहिन्यांचे तीन खांब कोसळले. त्यामुळे कर्जतहून बदलापुरकडे येणारी मार्गिका पूर्णपणे बंद झाली. तर शेजारच्या अनेक गावांचा वीज पुरवठा तब्बल १२ तासांसाठी ठप्प झाला. दुपारी दीडच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती महावितरण कार्यालयाने दिली.
कंत्राटदारांच्या बेजबाबदार कारभाराचा फटका अनेकदा नागरिकांना बसत असतो. असाच काहीसा प्रकार बदलापूर शहरात समोर आला आहे. बदलापूर शहरातून कर्जतकडे जाणाऱ्या महत्वाच्या मार्गावर मंगळवारी मध्यरात्री विजेचे तीन खांब कोसळले. बदलापूर शहराच्या वेशीवर पोदार या मोठ्या गृहसंकुलाच्या शेजारी असलेल्या नैसर्गिक प्रवाहाच्या शेजारी छोटेखानी पुलावर हे तीन विजेचे खांब पडले. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा तातडीने बंद करावा लागला. तर हा मार्ग पूर्ण विजेच्या खांबांनी आणि वीज वाहिन्यांनी व्यापला. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणे किंवा प्रवास करणे धोक्याचे झाले. परिणामी कर्जतकडे जाणाऱ्या मार्गिकेवरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली. या दरम्यान शेजारच्या दहिवली, कासगाव, वांगणी या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला.
सकाळच्या सुमारास वाहतुकीची वर्दळ वाढल्यानंतर या मार्गावर कोंडी होण्यास सुरूवात झाली. याच ठिकाणी दोन मोठ्या खासगी शाळा आहेत. त्यामुळे बदलापूर शहरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी घेऊन येणारी वाहने या कोंडीत अडकली. सोबतच ग्रामीण भागातून बदलापूर रेल्वे स्थानकात आणि शहरात येणाऱ्या प्रवाशांनाही या कोंडीच फटका बसला. अवजड वाहने आणि लहान वाहने एकाच वेळी एकाच मार्गिकेवर आल्याने मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली. त्यामुळे या भागात सकाळच्या सुमारास नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
महावितरणाने या घटनेची माहिती मिळताच वीज पुरवठा खंडीत केला होता. रात्री या ठिकाणी कोणतेही काम होऊ शकले नाही. सकाळी दहा नंतर या ठिकाणी काम करण्यात आले. जेथे खांब पडले त्या ठिकाणी खांबांच्या शेजारीच कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कंत्राटदाराने नाले बांधणीसाठी खद्दे खोदल्याची माहिती महावितरणाच्या कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांनी दिली. त्यामुळे हे खांब पडले. याबाबत माहिती मिळताच वीजपुरवठा बंद करून आम्ही दुरूस्तीचे काम सुरू केले. दुपारी दीडच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत केला, अशी माहिती काटकर यांनी दिली. हे खोदकाम करणआऱ्या कंत्राटदारावर आम्ही गुन्हा दाखल करणार असल्याचेही काटकर यांनी लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले.
