ठाणे – बदलापूर – काटई या महत्त्वाच्या मार्गावरून ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने दररोज हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते आणि याच मार्गाला लागून कल्याण-डोंबिवली, ठाणे तसेच मिरा-भाईंदर शहरांना पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी जाते. मात्र या जल वाहिनीवरच आता अनधिकृत पद्धतीने वाहने स्वच्छ करून देणाऱ्या ‘कार वॉशींग सेंटर’ चा मोठा उद्योग सुरु झाला आहे. काही वर्षांपूर्वी अंबरनाथ ते काटई दरम्यान अवघे दोन ते तीन वॉशींग सेंटर नजरेस पडत असे. मात्र गेल्या एक ते दोन वर्षांच्या कालावधीत याची संख्या तब्बल तीसच्या वर गेली आहे. यात एक छोटीशी टाकी भरून वाहने धुऊन देणाऱ्या लहानशा सेंटर पासून अत्याधुनिक मोटर, पाईप आणि यंत्रसामग्री वापरून गाडी धुणाऱ्या कार स्पा सेंटरचा समावेश आहे. एमआयडीसी प्राधिकरणाचा निष्क्रियपणा जिल्हातील या नियमित पाणीचोरीला कारणीभूत ठरत आहे.

बदलापूर – काटई मार्ग हा जिल्ह्यात वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मार्ग. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण – डोंबिवली या शहरांना हा मार्ग ठाणे, नवी मुंबई आणि पर्यायाने मुंबईशी जोडतो. याच रस्त्यावर पुढे अत्यंत वर्दळीचा असा शिळफाटा चौक ही टप्पात येतो. यामुळे या मार्गावरून आपल्या कामासाठी शहराबाहेर जाणाऱ्या वाहनधाकरांची संख्या प्रतिदिवस ही काही हजारांच्या घरात आहे. याचाच फायदा घेत या रस्त्याच्या दुतर्फा अनेक अनधिकृत बांधकामें उभी राहिली आहेत. हॉटेल, गॅरेज, टपऱ्या अशी सर्रास बांधकामे या रस्त्यावर दिसतात. यातच आता मोठया प्रमाणात कार वॉशिंग सेंटरचे या मार्गवर पेव फुटले आहे.

दरम्यान, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ या शहरांमध्ये काही ठिकाणी पाणी कपात लागू करण्यात आली आहे. काही भागांत एक दिवसाआड तर काही ठिकाणी मर्यादित वेळेसाठीच पाणीपुरवठा केला जात आहे. अशा परिस्थितीत एकीकडे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना, दुसरीकडे हजारो लिटर पाणी उघडपणे चोरीला जात आहे. या प्रकारामुळे केवळ पाण्याची नासाडी होत नाही, तर जलवाहिनीची संरचनात्मक हानीही होत आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणावर गळती किंवा पाइपलाईन फुटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तातडीने या सर्व बेकायदेशीर जोडण्यांवर कारवाई करून पाणीचोरी थांबवणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पाणीचोरीची “मोडस ऑपरेंडी”

या मार्गावरील बेकायदेशीर गाडी धुण्याच्या केंद्रांकडून पाणीचोरी अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने केली जाते. संबंधित ठिकाणी मुख्य पाईपलाईनला जाणीवपूर्वक सूक्ष्म छिद्र पाडले जाते आणि त्या छिद्रातून एक स्वतंत्र पाईप आत घालून त्याची जोडणी केली जाते. त्यानंतर हा भाग माती टाकून पूर्णपणे बुजवून टाकला जातो, जेणेकरून बाहेरून पाहताना कोणतीही छेडछाड झाल्याचे लक्षात येऊ नये. या पद्धतीने जोडलेला पाईप पुढे जवळच उभारलेल्या सुमारे एक हजार लिटर क्षमतेच्या टाकीपर्यंत नेला जातो. त्या टाकीत पाणी साठवण्यासाठी उच्च क्षमतेच्या मोटारींचा वापर केला जातो.

मोटार सुरू करताच पाइपलाईनमधील पाणी थेट या टाकीत खेचले जाते आणि अल्पावधीत टाकी पूर्ण भरली जाते. यानंतर अत्याधुनिक जेट स्प्रे, प्रेशर पंप आणि इतर यांत्रिक साधनांच्या साहाय्याने वाहन धुण्याची प्रक्रिया केली जाते. एका चारचाकी वाहनासाठी साधारणतः १५० ते २५० रुपये, दुचाकीसाठी १०० ते १५० रुपये, तर रिक्षांसाठीही याच दरात सेवा दिली जाते. एका केंद्रावर दररोज सरासरी २५ ते ३५ वाहने धुतली जात असल्याचे दिसून येते. गाड्या धुतल्यानंतर टाकीतील पाणी संपताच पुन्हा मोटारद्वारे पाईपलाईनमधून पाणी खेचून टाकी भरली जाते आणि ही संपूर्ण प्रक्रिया दिवसभर सतत सुरू ठेवली जाते. परिणामी, मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी होण्यासोबतच जलवाहिनीवर अतिरिक्त ताण येऊन गळतीचे प्रमाणही वाढत आहे.

साधारणतः एका चारचाकी वाहनासाठी १०० ते १५० लिटर पाणी लागते, तर दुचाकीसाठी ३० ते ६० लिटर आणि रिक्षा किंवा तीनचाकी वाहनासाठी ६० ते १०० लिटर पाणी खर्च होते. तथापि, प्रेशर जेटचा वापर असतानाही अनेक ठिकाणी पाण्याचा प्रवाह सतत सुरू ठेवला जात असल्याने एका चारचाकी वाहनामागे १५० ते २०० लिटरपर्यंत पाणी वापरले जाते. याचे एकत्रित केला असता, एका वॉशिंग सेंटरवर दररोज सरासरी २५ ते ३५ वाहने धुतली जात असल्यामुळे एका केंद्राचा पाणी वापर अंदाजे ३,००० ते ४,००० लिटर दरम्यान जातो. अंबरनाथ ते काटई या दरम्यान अशी अनेक केंद्र कार्यरत असल्याने एकूण पाणी वापराचा आकडा दररोज अंदाजे ४५,००० ते ८०,००० लिटरपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र आहे. म्हणजेच, या बेकायदेशीर पाणी उपशामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर पाण्याची चोरी होत असून, हा अपव्यय अनेक टँकर पाण्याच्या समतुल्य असल्याचे स्पष्ट होते.

जलवाहिनी लगत असलेल्या अनधिकृत कार वॉशींग सेंटरवर वेळोवेळी कारवाई करण्यात येते. मात्र काही ठिकाणी ते लगेच नव्याने उभे राहतात. अशा पद्धतीने केंद्र सुरु असल्यास त्याच्यावर एमआयडीसीच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्यात येईल. – उपअभियंता, पाणी पुरवठा विभाग, एमआयडीसी ( कल्याण डोंबिवली विभाग )