कल्याण – बदलापूर ते काटई दरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने चार पदरी सीमेंट काँक्रीट रस्त्याची बांधणी केली आहे. या रस्त्याच्या एका भागातून बारवी धरणाकडून आलेल्या जलवाहिन्या आहेत. हा रस्ते आणि त्या लगतच्या जलवाहिन्यांची नियमित देखभाल एमएमआयडीसीकडून केली जाते. एमआयडीसी चार पदरी रस्त्यालगतच्या दोन्ही बाजुला पाणी वाहून नेण्यासाठी बांधलेली महसूल विभागाच्या अखत्यारितील हद्दीतील गटारे, नाले, नैसर्गिक प्रवाह स्थानिक ग्रामस्थांनी व्यवसायांसाठी मातीचे भराव टाकून बुजवली आहेत. त्यामुळे काटई ते बदलापूर रस्ता पावसाळ्यात सतत जलमय होत आहे, अशी तक्रार एमआयडीसी डोंबिवली विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कल्याणचे तहसीलदार विकास गारूडकर यांच्याकडे केली आहे.

नाले, गटारे, नैसर्गिक प्रवाह बुजविण्यात आलेली हद्द महसूल विभागाच्या अखत्यारित येत असल्याने हे नाले, गटारे बुजविणाऱ्यांवर कारवाई करावी आणि हे बंदिस्त नाले, गटारे खुले करण्याची मागणी ‘एमआयडीसी’ने तहसीलदार गारूडकर यांच्याकडे केली आहे.

काटई बदलापूर रस्ता जलमय

मागील दोन वर्षांपासून कल्याण शिळफाटा रस्त्यालगतचा छेद रस्ता काटई ते बदलापूर हा सर्वाधिक वाहन वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरून ठाणे, मुंबईकडून येणारी वाहने काटई नाका येथून बदलापूर, कर्जतकडे धावतात. कर्जत, बदलापूर भागातील वाहने या रस्त्याने मुंबईकडे धावतात. खोणी गाव हद्दीत तळोजा येथून वाहने नवी मुंबई, पनवेल दिशेने धावतात. त्या भागातील वाहने काटई बदलापूर रस्ता, शिळफाटा रस्ता दिशेने येतात. नागरी वस्ती बरोबर डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, तळोजा भागातील औद्योगिक वस्तीमुळे सर्वाधिक मालवाहतूक काटई बदलापूर रस्त्याने होते.

या रस्त्यावरील सततच्या वाहन वर्दळीमुळे अनेक स्थानिक भूमाफियांनी रस्त्यालगतच्या, जलवाहिन्या गेलेल्या जमिनी आमच्या मालकीच्या आहेत. या जमिनींचा आम्ही कसाही वापर करू शकतो, असा विचार करून या रस्त्यालगतीच गटारे, नाले, नैसर्गिक प्रवाह भूमाफियांनी मातीचे भराव टाकून बुजवून टाकली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागा राहत नसल्याने हे पाणी थेट रस्त्यावर वाहून येते. थोडा पाऊस पडला तरी काटई ते बदलापूर, नेवाळी आणि त्यापुढील रस्ता जलमय होतो. मुसळधार पावसात हा रस्ता ठप्प होतो, असे एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्याने तहसीलदारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मागील आठवड्यात या रस्त्याची पाहणी केल्यानंतर हा गंभीर प्रकार लक्षात आल्याचे एमआयडीसीने पत्रात म्हटलेआहे.

ढाब्यांची उभारणी

बुजवलेल्या गटारे, नाले, नैसर्गिक प्रवाहांच्या मार्गांवर माफियांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने ढाबे, हाॅटेल्स, वाहन धुण्याच्या कार्यशाळा, पानटपऱ्या, वाहन दुरुस्ती कार्यशाळा सुरू केल्या आहेत. या माध्यमातून भूमाफिया पैसे कमवून स्थानिक प्रशासनाला एक पैशाचा महसूल देत नाहीत. नागरी सुविधांचा बोजवार उडवून हे माफिया, या भागातील व्यावसायिक नागरिकांच्या अडचणींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने काटई बदलापूर रस्त्याने नियमित प्रवास करणारे प्रवासी माफियांच्या या प्रकाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. यापूर्वी एमआयडीसीने या रस्त्यावरील बेकायदा अतिक्रमणे हटवली होती. ती पुन्हा उभारण्यात आली आहेत.

अधिक माहितीसाठी तहसीलदार विकास गारूडकर यांना संपर्क साधला. त्यांनी संपर्काला प्रतिसाद दिला नाही.