बदलापूर: घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडच्या विरुद्ध गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) आणि बहुजन मुक्ती पार्टी यांनी आंदोलन केले. ग्राहकांच्या वाढीव बिलाच्या समस्या असताना त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असून ग्राहकांना मनस्ताप होतो आहे. त्यामुळे कंपनीने याकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तर महानगर गॅस कंपनीच्या वतीने ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी यंत्रणा अधिक बळकट केली जाणार असून लवकरच ग्राहक समस्या मेळावा आयोजित केला जाईल, अशी माहिती कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये घरगुती गॅसचा पुरवठा अखंडित सुरू राहील यासाठी यंत्रणा काम करत आहेत.
व्यवसायिक सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल व्यावसायिक, केटरिंग व्यावसायिक आणि लग्न समारंभाचे सभागृह व्यवस्थापक चिंतेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये घरगुती गॅसचा पुरवठा अविरत सुरू आहे. हा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महानगर गॅस लिमिटेडच्या माध्यमातून बदलापूरत घरगुती जोडणीद्वारे गॅस पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही दिवसात वाढीव बिले आल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत.
या तक्रारींचा निपटारा योग्यरित्या केला जात नाही. ग्राहकांना तासनतास बसवून ठेवले जाते. ग्राहकांना योग्य उत्तरे दिली जात नाहीत, अशा तक्रारी वाढल्या आहेत. अनुषंगाने गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आणि बहुजन मुक्ती पार्टी यांच्या विद्यमाने महानगर गॅसच्या बदलापूर कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी अविनाश देशमुख, नीलेश येलवे उपस्थित होते.
तक्रार करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना खाजगी सुरक्षा रक्षक दाखवले जातात, ग्राहकांच्या मनात भीती निर्माण केली जाते, त्यांना योग्य उत्तरे दिली जात नाही, अवाच्या सव्वा बिलांवर दिलासा दिला जात नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अविनाश देशमुख यांनी केला. ग्राहकांच्या समस्या सुटल्या नाहीत तर जनतेच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल, असे अविनाश देशमुख यांनी सांगितले.
ग्राहकांच्या समस्या आणि राजकीय पक्षांचे आंदोलन याबाबत महानगर गॅसच्या जनसंपर्क अधिकारी निरा अस्थाना यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी येथे काही दिवसात ग्राहक मेळावा आयोजित केला जाणार असल्याची माहिती दिली. ग्राहकांच्या तक्रारी लक्षात घेता कल्याण येथील मुख्य ग्राहक संपर्क व्यवस्थापक यांना आठवडाभर बदलापूर येथे पाठवण्यात आले आहे.
ते ग्राहकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर दिलासा देत आहेत. ग्राहकांना तक्रारी करण्यासाठी विविध माध्यम खुली आहेत. तरी काही समस्या असतील तर ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा आणखी बळकट केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
गॅस पुरवठ्यावर परिणाम नाही
युद्धजन्य परिस्थितीमध्ये घरगुती गॅसच्या सिलेंडर वरून राज्यभर गोंधळ सुरू आहे. घरगुती पीएनजी गॅसचा कोणताही तुटवडा नाही. महानगर गॅसचा पुरवठा अखंडितपणे सुरू आहे, त्यात कोणताही खंड पडणार नाही ग्राहकांनी निश्चित राहावे असेही, नीरा अस्थाना यांनी स्पष्ट केले.
