कल्याण : महावितरणच्या कल्याण परिमंडळाकडून राबविण्यात येत असलेल्या सेवा सेतू व सेवा संकल्प अभियानाने आता गती घेतली आहे. महावितरणच्या बदलापूर विभागात मागील दोन आठवड्यांत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ४१३ नव्या वीज ग्राहकांना वीज जोडण्या देण्याची कार्यवाही पूर्ण केली. या वीज ग्राहकांनी महावितरणकडे वीजपुरवठ्यासाठी अर्ज केले होते. या अर्जांची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही पूर्ण करून या नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महावितरणच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी बदलापूर, मुरबाड विभागात स्टाॅल लावण्यात आले आहेत. मुरबाडचे भाजप आमदार किसन काथोरे यांनी मुरबाड परिसरातील स्टाॅलला भेट देऊन माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासह मुरबाड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष मोहन सासे, संतोष पवार, कनिष्ठ अभियंता सचिन धनावडे उपस्थित होते.

वीज ग्राहकांचे समाधान

मागील पंधरवड्यात बदलापूर पूर्व उप विभागातील २०७, पश्चिम उपविभागात १८१ वीज ग्राहकांच्या वीज देयकाची दुरुस्ती करून देण्यात आली आहे. स्मार्ट मीटर संदर्भात एकूण १२९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पूर्व उप विभागातील ६२ तर पश्चिम उप विभागात ३९ तक्रारींचे निवारण करण्यात आल्याची माहिती महावितरण अधिकाऱ्यांनी आमदार कथोरे यांना दिली.

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी १९ वीज ग्राहकांनी उत्सुकता दाखवली आहे. महावितरणच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी कल्याण, बदलापूर, उल्हासनगर व अंबरनाथ येथील शासकीय कार्यालयात स्टाॅल लावण्यात आले आहेत. वीज ग्राहकांनी या ठिकाणी भेट देण्याचे आवाहन अधिक्षक अभियंता विजय फुंदे, कार्यकारी अभियंता आनंद काटकर, राजेंद्र भांबर, हरीष भराडे यांनी केले आहे.

महावितरणच्या या उपक्रमांची माहिती घेतल्यानंतर आमदार किसन कथोरे यांनी सांगितले, मुरबाड परिसर हा ग्रामीण भाग आहे. बहुतांशी नागरिक शेतकरी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या कार्यालयात फेऱ्या मारण्यास न लावता महावितरण अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे गावागावात जाऊन वीज ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेतली. त्यांना नवीन वीज मीटर, त्यांच्या वीज देयक याविषयी माहिती दिली. त्यांच्या तक्रारींची सोडवणूक केली तर महावितरण अधिकारी आणि वीज ग्राहक यांच्यात एक समन्वयाचा पूल तयार होईल.

शासकीय योजनांचे लाभ देण्यासाठी अशा समन्वयाची खूप गरज आहे. यादृष्टीकोनातून महावितरणने सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून सुरू केलेला हा उपक्रम खूप प्रशंसनीय आहे, असे आमदार कथोरे यांनी सांगितले. फोटो ओळ महावितरणच्या योजनांची माहिती घेताना मुरबाडचे भाजप आमदार किसन काथोरे.