बदलापूर: बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने पुन्हा एकदा टीओडी मीटरच्या मुद्द्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले असून या वाढीव बिलांसदर्भात अविनाश देशमुख यांनी केलेल्या आंदोलनानंतर टीओडी मीटरविरूद्ध संताप व्यक्त होतो आहे. बदलापूर येथील सोनिवली भागात असलेल्या महावितरण कार्यालयात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी अव्वाच्या सव्वा बिले आल्यामुळे त्रस्त असलेल्या वीज ग्राहकांसह धडक दिली. सदोष बिले दुरुस्त करून द्यावीत, तसेच ग्राहकांच्या परवानगीशिवाय टीओडी मीटर बसविणाऱ्या कंपनीवर व महावितरण अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर उपअभियंत्यांना मारहाण, शिवागाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा गुन्हा अन्यायकारक असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

टीओडी मीटर बसविल्यापासून महिन्यागणिक वीज बिलाची रक्कम वाढत जाऊन ती ८ ते १० हजारांपर्यंत गेली असून काही ग्राहकांना तर तब्बल ३० ते ३५ हजारांपर्यंत बिले आल्याने सर्वसामान्य नोकरदार वर्ग हवालदिल झाला आहे, असा आरोप अविनाश देशमुख यांनी केला. चुकीची व सदोष बिले देऊन वीज ग्राहकांची लूट सुरू असल्याचा आरोप करत या असंतोषाचा सामना महावितरण अधिकाऱ्यांना करावा लागेल असा इशारा अविनाश देशमुख यांनी दिला. या आंदोलनानंतर मागील तीन महिन्यांच्या वीज बिलाचा आढावा घेऊन चुकीची असलेली बिले दुरुस्त करून देण्याचे तसेच ग्राहकांच्या परवानगीशिवाय टीओडी मीटर न बसविण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान, यासंदर्भात योग्य कार्यवाही न झाल्यास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तीव्र जनआंदोलन करणार असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी जून २०२५ मध्ये महावितरण कार्यालयाला अदानींच्या फोटोंचे तोरण बांधत अविनाश देशमुख यांनी ग्राहकांच्या परवानगीशिवाय टीओडी मीटर बसविण्यात येत असल्याच्या मुद्द्यावर आंदोलन केले होते. मात्र, महावितरणने याच आंदोलनाची चित्रफित वापरून टीओडी मीटर कसे चांगले आहेत, ते बसवण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही, मीटर ही महावितरणची मालमत्ता असते आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ते कसे गरजेचे आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, सोनिवली येथील कार्यालयातील या आंदोलनानंतर महावितरणचे उप कार्यकारी अभियंता भरत वाघमाडे यांच्या फिर्यादीवरून अविनाश देशमुख यांच्यावर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनिवली कार्यालयात शासकीय कामात अडथळा निर्माण केला, उप कार्यकारी अभियंता यांना मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करत अब्रुनुकसान केले आणि कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय केली, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे, नागरिकांच्या हितासाठी केलेल्या आंदोलनात मारहाणीचा विषय कुठून आला असा प्रश्न अविनाश देशमुख यांनी उपस्थित केला आहे. टीओडी मीटरमुळे नागरिकांना होणारा मनस्ताप दाबण्यासाठीच हा गुन्हा दाखल करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करत याप्रकरणी पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.