बदलापूर: बदलापूर पूर्वेकडील मानकीवली एमआयडीसी परिसरात शुक्रवारी दुपारी एका कापड प्रक्रिया (डाईंग) कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. प्लॉट क्रमांक एफ-११ मधील ‘इको केंट प्रोसेसर’ या कंपनीत दुपारी चारच्या सुमारास ही आग लागली. कंपनीत असलेला मोठ्या प्रमाणावरील कापडसाठा आणि रसायनांच्या ड्रममुळे आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले होते. मात्र, बदलापूर अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे तासाभराच्या शर्थीनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून मोठा अनर्थ टळला आहे.
आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीतील कामगारांनी तातडीने बाहेर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. सुरुवातीला काही कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त होत असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण होते. मात्र, सर्व कामगार सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शैलेश जगताप व १८ जवानांच्या पथकाने पाच अग्निशमन गाड्यांसह घटनास्थळी धाव घेतली. कापड आणि रसायनांमुळे आग वेगाने पसरत होती, परंतु जवानांनी पाण्याचा मारा करून आगीला वेढा घातला आणि तासाभरात ती आटोक्यात आणली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महावितरणने सकाळपासून तांत्रिक कामासाठी शटडाउन घेतला होता. वीजपुरवठा पूर्ववत होताना झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, आगीच्या नेमक्या कारणांचा अधिकृत तपास अद्याप सुरू आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या भीषण आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, मानकीवली एमआयडीसी परिसरात वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे उद्योगांमधील सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. औद्योगिक पट्ट्यातील वाढत्या आगीच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
