बदलापूरः ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रात झपाट्याने होत असलेले शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यात यावे, अशी मागणी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्यांनी सभागृहाचे आणि शासनाचे लक्ष या महत्त्वाच्या प्रश्नाकडे वेधले. त्यामुळे पुन्हा एकदा बदलापूर शहराची स्वंतत्र महापालिका होणार की अंबरनाथ शहरासोबत संयुक्त महापालिका होणार, यावर चर्चा रंगू लागल्या आहेत.

अंबरनाथ आणि बदलापूर ही दोन जुळी शहरे मुंबई महानगर क्षेत्रातील दोन स्वतंत्र अ वर्ग नगर परिषदा आहेत. महानगरांच्या वेशीवर असलेल्या या शहरामंध्ये गेल्या काही वर्षात वेगाने नागरिकरण झाले. मोठ्या संख्येने परवडणारी घरे उपलब्ध झाल्याने येथे स्थलांतरण वाढले. त्यामुळे गेल्या काही वर्षात विकासापासून दूर असलेल्या या शहरांमध्ये मेट्रोचे वारे वाहू लागले. मात्र विकासाचा वेग आणि नागरिकरणाचा वेग यात तफावत असल्याने पायाभूत सुविधांवर वाढत्या लोकसंख्येचा भार पडतो आहे. वाहतूक दळणवळणासाठी रेल्वेवर अवलंबून असलेली येथील मोठ्या संख्या आणि पर्यायाने त्यात संथगतीने होणाऱ्या विकासामुळे नोकरदार वर्गाचा प्रवास जीवघेणा झाला आहे.

अशा स्थितीत दोन्ही शहरांची स्वतंत्र महापालिका की संयुक्त महापालिका हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेला आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी कुळगाव बदलापूर नगर परिषदेची स्वतंत्र महापालिका करावी अशी मागणी केली. कुळगाव-बदलापूर शहराचा विकास अत्यंत वेगाने होत असून वाढत्या लोकसंख्येच्या रेट्यामुळे शहराच्या विकासाचा विस्तार आजूबाजूच्या ग्रामपंचायतींच्या हद्दीकडे वळत आहे.

या अनियंत्रित वाढीमुळे परिसरात अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामांचा सुळसुळाट होण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. वाढत्या शहरीकरणाला योग्य दिशा देण्यासाठी आणि नियोजनबद्ध विकासासाठी शहराच्या हद्दीचा विस्तार करणे अत्यंत गरजेचे बनले आहे, असे ते म्हणाले. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे धूळखात पडून असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. आजघडीला कुळगाव-बदलापूर शहराची लोकसंख्या सुमारे पाच लाखांच्या घरात पोहोचली आहे.

इतक्या मोठ्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरवण्यासाठी नगरपालिकेचे तोकडे पडणारे स्वरूप लक्षात घेता, शासनाने तातडीने या हद्दवाढीच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी. तसेच, या वाढीव क्षेत्राचा समावेश करून कुळगाव-बदलापूर नगर परिषदेला महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार किसन कथोरे यांनी सभागृहाच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे. बदलापुरची स्वतंत्र महापालिका असावी आणि अंबरनाथसोबत संयुक्त महापालिका नसावी असा आग्रह यापूर्वीही आमदार कथोरे यांनी मांडलेला आहे. त्यामुळे या मागणीनंतर यावर सरकारकडून काही ठोस पाऊल उचलले जाईल की पुन्हा हा विषय चर्चेपुरता मर्यादीत राहील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, दोन्ही नगर परिषदांवर भाजपने आपला नगराध्यक्ष विराजमान केला असून अंबरनाथमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे.