बदलापूर: कुळगाव बदलापूर नगरपरिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रस्ते कामाचे बिल आणि सुरक्षा ठेव मोकळी करण्यासाठी ६ टक्के लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला असून, नगरपरिषदेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीपर्यंत नगर परिषदेतील कंत्राटदारांकडे बिले देण्यासाठी टक्केवारीची मागणी केली जात असल्याचे आरोप होते होते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला कार्यमुक्तही करण्यात आले होते.

या प्रकरणातील तक्रारदार यांची कंपनी रस्ते बांधणीचे काम करते. त्यांना कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या एकूण ७७ विकास कामांचे कंत्राच मिळाले असून त्यांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. या कामांपैकी दोन देयकांची १७ लाख ४४ हजार रुपये आणि पूर्वी केलेल्या कामाची सुरक्षा अनामत रक्कम ४ लाख ९९ हजार रुपये, अशी एकूण २२ लाख ४३ हजार रुपयांची रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा करण्यात आली होती. ही रक्कम जमा करून दिल्याच्या मोबदल्यात ६ टक्के प्रमाणे १ लाख ३४ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी लेखाधिकारी विकास चव्हाण यांनी केली अशी तक्रार संबंधित तक्रारदारांची होती.

तक्रारदाराने या लाचेच्या मागणीविरोधात ९ डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी १० डिसेंबर २०२५ रोजी पडताळणी करण्यात आली. या पडताळणी दरम्यान, विकास चव्हाण यांनी कामाचा मोबदला म्हणून ६ टक्के रक्कमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. या पडताळणीच्या आधारे गुरूवार, ३० एप्रिल रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये विकास चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद आहिरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या गुन्ह्याबाबत विकास चव्हाण यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा दूरध्वनी बंद होता. याबाबत कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांना संपर्क केला असता, त्यांनी असा गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त मान्य केले. लेखाधिकारी विकास चव्हाण यांना महिनाभरापूर्वीच कार्यमुक्त केले होते. तसेच या प्रकरणाची माहिती त्यांच्या संबंधित विभागालाही कळवली जाईल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

टक्केवारीवर शिक्कामोर्तब

काही महिन्यांपूर्वी कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील विविध कामांची चौकशी करण्याचे काम नगर परिषदेतील समितीच्या माध्यमातून सुरू होते. त्याच काळात कंत्राटदारांनी पालिकेत कामांचे देयक मिळवण्यासाठी ११ टक्क्यांची मागणी केली जात असल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर एकाएकी चौकशीही थांबली आणि आरोपही थांबले. त्यात लेखाधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या लाचेच्या मागणीच्या गुन्ह्यानंतर आणि त्यातील तपशिलानंतर आता पालिकेतील टक्केवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा रंगली आहे.