बदलापूरः सहा वर्षांनंतर मांडण्यात आलेल्या पहिल्याच लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या अर्थसंकल्पात नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रात नगराध्यक्षा सुकन्या योजनेची घोषणा केली आहे. प्रत्येक कन्येच्या जन्मावेळा ५ हजार रूपये बँक खात्यात टाकले जाणार आहेत. त्यासह महिलांना केंद्रस्थानी ठेवून महिला अर्थसंकल्पाचा संकल्प करण्यात आला आहे. महिला आरोग्य, रोजगार प्रशिक्षण, गर्भ संस्कार, महिलांसाठी रूग्णालय अशा अनेक योजना महिलांसाठी घोषीत करण्यात आल्या आहेत. यासह दुबे रूग्णालयाची उभारणी, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, नाट्यगृह, क्रीडासंकूल अशा अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

जागतिक महिला दिन्याच्या दुसऱ्याच दिवशी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षांनी पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. एकूण १ हजार ९८ कोटी ८७ लाख रूपये जमेचा तर १ हजार ९८ कोटी ७५ लाख खर्चाचा असा हा ११ लाख ७६ हजारांचा शिलकी अर्थसंकल्प आहे. यात महत्वाकांक्षी अशा नगराध्यक्षा सुकन्या योजनेची घोषणा करण्यात आली असून ८ मार्च २०२६ नंतर जन्मलेल्या प्रत्येक कन्येच्या नावे बँक खात्यात ५ हजार रूपये जमा केले जाणार असून, १८ वर्षानंतर ते व्याजासह मिळतील. यासाठी ७५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. महिलांच्या आरोग्यासाठी २५ लाख, गर्भ संस्कार केंद्रासाठी ५० लाख, महिलांसाठी स्वतंत्र २०० खाटांच्या रूग्णलयासाठी तरतूद करण्यात आली आहे. कौशल्या नारी अभियानासाठी १ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

उत्पन्न वाढीसाठी अभय योजनेनंतर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. येत्या काळात मालमत्ता करात सुट देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. यंदा नगर परिषद कर्मचाऱ्यांना तसेच शिक्षकांना सानुग्रह अनुदान (दिवाळी बोनस) देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच नगर परिषद शाळांच्या शिक्षकांच्या वेतनासाठी १ महिन्याचा पगार राखीव ठेवला जाणार आहे. शासनाकडून अनुदान उशिरा आल्यास वेतन रखडण्याचे प्रकार थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नाका कामगार कल्याणासाठी १० लाखांची तरतूद असून त्यांच्यासाठी विशेष कक्ष उभारला जाणार आहे. त्यांना शासकीय योजनांचा लाभ करून दिला जाणार आहे.

नगर परिषद देणार शिष्यवृत्ती

दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. स्पर्धा परिक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती दिली जाणार असून त्यासाठी १० लाख तरतूद आहे. उपनगराध्यक्षा प्रियांका दामले यांनी शिक्षण विभागाची जबाबदारी घेताच शाळांची पाहणी केली होती. खासगी शाळांच्या दर्जाचे गणवेश, बुट, रेनकोट देण्याचा निर्णय घेण्यात आला असून पोषण आहारात अंडी, केळी, राजगिरा लाडू देण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यासाठी अद्ययावत संगणकीय प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे.

आरोग्यावर लक्ष

कै. शिवप्रसाद दुबे रूग्णालयाच्या बांधणीसाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली असून शासनाकडे २५ कोटींची मागणी केली जाणार आहे. येथे डायलिसीस, प्रसुती गृह, बाह्यरूग्ण विभाग, क्ष किरण सेवा, अस्थिरोग विभाग, रेबिड, सर्पदंश लस सेवा सुरू केली जाईल. योग भवन १ कोटी, तर प्रदुषण रोखण्यासाठी भुयारी गटार योजनेतील पालिकेचा हिस्सा ४४ कोटी ठेवण्यात आले आहेत.

दिव्यांगांसाठी आनंदाची बातमी

शहरातील ५०० नोंदणीकृत दिव्यांग बांधवांना यापूर्वी प्रति माह एक हजार वेतन मिळत होते. यात दुप्पटीने वाढ करत हे वेतन आता २ हजार रूपये करण्यात आले आहे.

  • इतर तरतुदी
  • अग्नीशमन दल – १ कोटी
  • श्वान निर्बिजीकरण, निवारा – ३.२५ कोटी
  • नाट्यगृह – ५ कोटी तरतूद
  • एरंजाड सांस्कृतिक केंद्र – ५ कोटी
  • क्रीडा संकूल – कात्रप – ५ कोटी, हेंद्रेपाडा – ५ कोटी,
  • कला
  • क्रीडा महोत्सव, नगराध्यक्षा चषक – २५ लाख
    स्मारके – छत्रपती संभाजी महाराज, – ५ कोटी, स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा १ कोटी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते सोनिवली स्मारक सुशोभीकरण १ कोटी, येथेच शिवसृष्टी पथ – १ कोटी