बदलापूरः शुक्रवारी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या स्विकृत सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत शिवसेनेने निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराला स्विकृत सदस्य म्हणून संधी दिल्याने दोन नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी थेट गट नेत्यांचा राजीनामा मागितला. तर ज्यांचे पक्षासाठी योगदान नाही, जे आताच पक्षात आले त्यांना कशी संधी दिली जाते, असा प्रश्नही या नाराज नगरसेवकांनी उपस्थित केला. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही या नाराजींनी स्पष्ट केले आहे.
कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक २४ नगरसेवक विजयी झाले. मात्र नगराध्यक्ष पदाच्या निवडीत भाजपने बाजी मारली. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या हातची सत्ता गमवावी लागली. यात भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी (अजित पवार) निवडणूक पूर्व युती करून सत्तेचा आकडाही गाठला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीन नगरसेवकांमुळे भाजपच्या गटाची बेरीज शिवसेनेपेक्षा एकने अधिक आहे. त्यामुळे एक अधिकचा स्विकृत नगरसेवक त्यांना मिळाला.
या आकडेवारीनुसार गट स्थापन झाल्यानंतर शुक्रवारी बदलापूर नगर परिषदेत स्विकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया संपन्न झाली. यात शिवसेनेने पराभूत झालेले हेमंत चतुरे आणि दिलीप बैकर यांना संधी दिली. हेमंत चतुरे हे काही महिन्यांपूर्वी भाजपातून शिंदेंच्या शिवसेनेत आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका शीतल राऊत यांनी या प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी माध्यमांशी बोलताना हा प्रकार अन्यायकारक असून पक्षात कालपरवा आलेल्या आणि पक्षाचे तिकिट घेऊन २ हजार ७५० मतांनी पराभूत झालेल्या आणि संपूर्ण प्रभागात पराभव झालेल्या उमेदवारांना कशी काय संधी मिळते, असा प्रश्न उपस्थित केला.
आम्ही अनेक वर्ष पक्षासाठी काम केले मात्र अशा पद्धतीने पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलण्याचा प्रकार कधी झाला नाही. आमचे गटनेते श्रीधर पाटील यांनी या सर्व बाबींचा विचार करण्याची गरज होती, असा संताप पराभूत उमेदवार प्रविण राऊत यांनी व्यक्त केला. याबाबत आम्ही पक्षाचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचेही शीतल राऊत यांनी सांगितले. पक्षात अनेक असे पदाधिकारे होते त्यांनी तीन ते चार प्रभागात प्रभाव पाडून नगरसेवक जिंकून आणले, त्यांना संधी देण्याची गरज होती, असेही राऊत म्हणाल्या.
पक्षश्रेष्ठींचा आदेशानुसारच प्रक्रिया
स्विकृत नगरसेवकांसाठी पक्षाच्या सर्व नगरसेवकांना एकमताने नावे देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी एका बंद लिफाफ्यात सदस्यांची नावे कळवली होती. त्यानुसार आम्ही सर्व प्रक्रिया राबवली. त्यांनी ज्या सदस्यांची नावे दिली ती आम्ही पिठासीन अधिकाऱ्यांना दिली. – श्रीधर पाटील, गटनेते, शिवसेना, कुळगाव बदलापूर नगर परिषद.
पराभवाचेही कारण शोधावे
स्थानिकांना विचारात घेऊन राजकारणाची दिशा ठरवली असती तर बदलापुरात शिवसेनेचा नगराध्यक्ष विजयी झाला असता. त्यामुळे आता वरिष्ठांना स्थानिक राजकारणात लक्ष घालावे आणि पराभवाची कारणेही शोधावी, अशीही मागणी यावेळी राऊत यांनी केली.
