बदलापूरः निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शहरात विकास कामांची यादी वाचताना न थकणाऱ्या लोकप्रतिनिधींनी पाच महिन्यातच शहरात सुमारे १८५ कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या ४०० पेक्षा कामांचा समावेश असलेली सर्वसाधारण सभा आयोजीत केली आहे. विशेष म्हणजे शहरात सुशोभीकरणाच्या नावाखाली ४० कोटींपेक्षा अधिकचा खर्च केला जाणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात चौक, रस्ते, दुभाजक सुशोभीकरण, उद्यान सुशोभीकरण, भिंतींची रंगरंगोटी, रस्ते फर्निचर अशा कामांची मोठी यादी आहे. त्यामुळे ही सर्वसाधारण सभा वादात सापडण्याची चिन्हे आहेत.
पाच महिन्यांपूर्वी झालेल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान प्रचारात सत्ताधारी भाजप आणि शिवसेना केलेल्या कामांची यादी वाचताना थकत नव्हते. कोट्यावधींचा निधी, असंख्य कामे, डांबरमुक्त रस्ते केल्याचे रेटून सांगितले जात होते. आधीच्या सत्ताधाऱ्यांनी कसा भ्रष्टाचार केला हेही सांगण्यात सर्वच पक्ष आघाडीवर होते. मात्र आता नगर परिषदेचा कारभार प्रशासकीय कारभारातून मुक्त होत लोकप्रतिनिधींच्या हाती आल्यानंतर नगर परिषदेने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे.
येत्या २० मे रोजी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजीत करण्यात आली असून या सभेच्या विषय पत्रिकेत तब्बल ४६३ विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यात नियमित सात प्रस्ताव अशून आस्थापनाविषयक तीन प्रस्ताव आहेत. त्यानंतर ४७ प्रस्ताव हे प्रशासनाचे आहेत. मात्र या विषयांनंतर तब्बल ४०६ विषय हे सदस्यांचे आहेत. या सभेत सुमारे १८५ कोटींची विषय चर्चेले जाणार असून यातील काही विषय वगळता बहुतांश विषय नगर परिषदेच्या निधीतून मार्गी लावले जाणार असल्याची माहिती आहे.
यातील काही धोरणात्मक विषय आहेत. मात्र शहरात सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यावधींची उधळपट्टी केली जाणार असल्याचे या विषय पत्रिकेतून स्पष्ट होते आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर विषय चर्चेिले जातील का, त्यांचे टिपण तयार आहे का, असे अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. सुशोभीकरणाच्या नावे कोट्यावधीबदलापूर शहरात गेल्या काही वर्षात चौक सुशोभीकरण, कोपरा सुशोभीकरण, कमानी उभारणे, उद्यान सुशोभीकरणाच्या नावाखाली यापूर्वीच कोट्यावधींची उधळपट्टी करण्यात आली आहे.
प्रशासकीय काळात यावर नियंत्रण आले होते. विशेष म्हणजे अनेक चौक सुशोभीकरण केल्यानंतर रूंदीकरणात तोडण्यात आले. नागरिकांच्या कराचा चुराडा होत असल्याचा आरोप त्यावेळी केला जात होता. मात्र २० मे रोजी होणाऱ्या सभेतही सुमारे ४० कोटींचे प्रस्ताव हे सुशोभीकरणाच्या प्रकारातील आहेत. यात चौक सजावट, सुशोभीकरण, रंगरंगोटी, रोड फर्निचर, पदपथ सुशोभीकरण, दुभाजक सुशोभीकरण अशा विविध कामांचा समावेश आहे. आधीच्या सुशोभीकरणाच्या कामांची स्थिती, त्याची दुरावस्था यावरून या नव्या सुशोभीकरणाची खरच गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
पेव्हर ब्लॉक, पायवाटांचेही विषय
शहरातील विविध भागात दहा लाखांच्या कामांचे अनेक प्रस्ताव यात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यासोबतच पेव्हर ब्लॉक, पायवाटा, गटार दुरूस्तीच्या अनेक कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याआधी त्याची प्रत्यक्ष गरज, पाहणी करण्याची गरज व्यक्त होते आहे. काही कामांचे नावात साम्य असून निधीत बदल आहे. एकाच नावाचे दोन दोन प्रस्तावही विषय पत्रिकेत आहेत.प्रतिक्रियाः यातील अनेक विषयांमध्ये राज्यस्तरीय नगरोत्थान, जिल्हास्तरीत नगरोत्थान, जिल्हा नियोजन समिती आणि विविध अनुदानांमधून निधी उपलब्ध होणार आहे. काही विषयांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी जाणार आहेत. यातील प्रशासनाचे ४७ विषय आहेत. इतर विषय सन्माननीय सदस्यांचे आहेत. – मारूती गायकवाड, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगर परिषद.
