बदलापूर: कुळगाव बदलापूर नगर परिषदेने आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी एक अत्यंत स्तुत्य आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नगर परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता केवळ खिचडीवर समाधान मानावे लागणार नाही. तर त्यांच्या पोषण आहारात आता केळी, खजूर आणि राजगिरा लाडू यांचाही समावेश करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी उपनगराध्यक्ष प्रियांका दामले यांनी नगर परिषद शाळांना अचानक भेटी देऊन विद्यार्थ्यांसोबत बसून खिचडीचा आस्वाद घेतला होता. यावेळी त्यांनी पोषण आहाराची गुणवत्ता तपासली असता, विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी आहारात अतिरिक्त पौष्टिक पदार्थांची गरज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्या या पुढाकारानंतर, नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

कुळगाव बदलापूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा रूचिता घोरपडे आणि उपनगराध्यक्षा तथा शिक्षण सभापती प्रियांका दामलेयांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. यात नगर परिषदेच्या शाळांच्या बाबतीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. १५ जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. नगर परिषदेच्या एकूण १६ प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीचे ३ हजार ४४९ विद्यार्थी शिक्षण घेत असून, हे विद्यार्थी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शाळेत असतात.

या विद्यार्थ्यांच्या आरोग्यास आवश्यक असणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळावीत, या उद्देशाने आठवड्यातून किमान तीन दिवस हा पूरक आहार दिला जाणार आहे. यामध्ये आठवड्यातील एक दिवस केळी, एक दिवस खजूर आणि एक दिवस राजगिरा लाडू अशा स्वरूपात वाटप केले जाईल. या संपूर्ण उपक्रमासाठी प्रशासनाने ८० लाख रुपयांची विशेष आर्थिक तरतूद केली आहे.

नगर परिषदेच्या या शाळांमध्ये सध्या १ हजार ७५२ मुले आणि १ हजार ६९७ मुली शिक्षण घेत आहेत. इयत्तानिहाय विचार केल्यास पहिलीत ४९३, दुसरीत ४८२, तिसरीत ५२५, चौथीत ५२४, पाचवीत ४५१, सहावीत ४०३, सातवीत ३७० आणि आठवीत २०१ विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षापासून हा पौष्टिक आहार मिळणार आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होते आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी राबविलेला हा उपक्रम इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आदर्श ठरणारा आहे.