Badlapur new flyover project by MMRDA: बदलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेला गतीमान करण्यासाठी शहरात लवकरच नवा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. बदलापूर पश्चिमेतील बॅरेज रस्त्यावरून हा उड्डाणपूल कल्याण – कर्जत रेल्वे मार्ग ओलांडून पूर्वेतील औद्योगिक वसाहतीजवळील होप पावर हाऊस अर्थात बदलापूर कर्जत मार्गावर उतरेल. या मार्गामुळे शहरात पूर्व पश्चिम प्रवास करणे सोपे होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने या कामासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.

बदलापूर शहराच्या वेशीवरून जवाहरलाल नेहरू न्यास ते बडोदे द्रुतगती महामार्ग आणि बदलापूर ते नवी मुंबई असा प्रवेश नियंत्रित (एक्सेस कंट्रोल) महामार्ग जात असला तरी शहरात मात्र पूर्व पश्चिम प्रवासासाठी अवघा एक उड्डाणपूल अस्तित्वात आहे. त्यामुळे शहराच्या कोणत्याही टोकापासून दुसऱ्या भागात जाण्यासाठी मध्यवर्ती भागातील याच उड्डाणपुलावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असते. पावसाळ्यात या उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने दो्ही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.

त्यामुळे शहरात नव्या उड्डाणपुलांची मागणी होती. याच पार्श्वभूमीवर बदलापूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या बेलवली येथील शिवमंदिर तलाव ते कार्मेल शाळेपर्यंत उड्डाणपुलाची उभारणी केली जाते आहे. त्यासाठीची सर्व प्रक्रियाही पार पडली आहे. हा उड्डाणपूल झाल्याने वाहनचालकांना बहुतांश दिलासा मिळेल. त्याचा फायदा अंबरनाथच्या चिखलोली परिसर, अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भाग अशा सर्वांना होईल. मात्र बदलापूर पूर्वेतील खरवई, पश्चिमेतील बॅरेज रस्ता परिसरातून प्रवास करण्यासाठी मात्र बदलापुरातील सध्याच्या एकमेव उड्डाणपुलाचाच वापर करावा लागेल. त्यामुळे शहराच्या स्थानक परिसरातील कोंडी जैसे थे राहणार आहे. त्यामुळे शहरातील बॅरेज रस्ता ते होप इंडिया असा उड्डाणपूल उभारावा अशी मागणी होती. अखेर एमएमआरडीएने या उड्डाणपुलाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाच्या कामासाठी निविदा मागवल्या आहेत.

उड्डाणपुलाचा फायदा काय

सध्याच्या घडीला रमेशवाडी, रितु वर्ल्ड ते बदलापूर पूर्वेतील खरवई या परिसरात प्रवासासाठी चार ते पाच किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. बदलापूर गाव, ग्रामीण भागातील वाहतूक स्थानक परिसरातून होत पूर्वेला जाते. त्यामुळे स्थानक परिसर, बस स्थानक परिसर आणि एकमेव उड्डाणपूल कोंडीत अडकतो. नव्या उड्डाणपुलामुळे हा प्रवास काही मिनिटात होईल. त्यामुळे स्थानक परिसरातील कोंडीही फुटेल. विद्यमान उड्डाणपुलावरील भार कमी होईल. त्यामुळे इंधन, वेळ आणि श्रम वाचतील.

नेमकी निविदा कसली

व्यवहार्यता अभ्यास, सविस्तर प्रकल्प आराखडा आणि निविदा प्रक्रिया व्यवस्थापन करणे, अशी कामे करून घेण्यासाठी ही निविदा मागवण्यात आली आहे. सहा महिन्यात हा आराखडा आणि अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. यात पुढील ४० वर्षांची वाहतूकीची स्थिती, वाहतूक सर्वेक्षण, उड्डाणपुलाची उभारणी, त्यात आवश्यक बदल, अतिरिक्त मार्गिका यांचा आढावा घेणे अपेक्षित आहे. भूसंपादन, पुनर्वसन, सुविधा गोष्टींचे स्थलांतरण किंवा बदल, प्रकल्प बाधितांशी समन्वय अशी कामेही यात नमूद आहेत.