बदलापूर : बदलापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित दुसऱ्या उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला. या पुलावरून प्रवास करण्यासाठी बदलापूरकरांना २०२९ सालाची वाट पाहावी लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने या उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी मार्च २०२६ मध्ये कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यानुसार उड्डाणपुलाची उभारणी करण्यासाठी ३६ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने, हे काम २०२९ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.

बदलापूर पूर्व व पश्चिम परिसरांना जोडणारा शहरातील एकमेव उड्डाणपूल वाढत्या वाहन संख्येला अपुरा पडत आहे. या उड्डाणपुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यातही उड्डाणपुलाच्या प्रवेशाला उतारावर पावसाळ्यात खड्डे पडले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी, वाहन चालकांना गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे.

सध्याचा उड्डाणपूल अरुंद असल्याने वाहनांच्या संथगतीने सकाळ व सायंकाळी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पुलाला जोडणाऱ्या सर्वच मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी दुचाकी व रिक्षांसाठी बेलवली येथे एक अरुंद भुयारी मार्ग आहे, मात्र जोरदार पावसात हा परिसर पाण्याखाली जात असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते.

बऱ्याचदा शहरातील शालेय विद्यार्थी व कार्यालय गाठणारे नागरिक वाहतूक कोंडीत अडकून पडतात. या समस्येवर तोडगा म्हणून बेलवली येथील लोटस तलावापासून पूर्वेला कार्मेल शाळेजवळ उतरणाऱ्या ७८० मीटर लांबीच्या व १२ मीटर रुंदीच्या नव्या उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये निघालेल्या पहिल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने दुसऱ्यांदा निविदा जाहीर करण्यात आली होती.

अखेर मार्च २०२६ मध्ये कार्यादेश दिल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत असली तरी, बांधकामाचा इतिहास व ३६ महिन्यांचा कालावधी पाहता बेलवली भुयारी मार्गातील आणि शहरातील वाहतूक कोंडी आणखी तीन वर्षे कायम राहणार हे स्पष्ट झाले आहे. एकीकडे उड्डाणपुलासाठी आणखी तीन वर्षांची प्रतीक्षा असताना, दुसरीकडे ज्या भागात या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, त्या अंबरनाथ-बदलापूर शहरांच्या सीमेवरील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे.

खड्डेग्रस्त अरुंद मार्गिका

– या सीमेवरील सिग्नलवर अंबरनाथकडून बदलापूरला येणाऱ्या मार्गिका अतिशय अरुंद आहेत. तसेच, शेजारचा बारवी धरणाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खड्ड्यांनी व्यापला गेला आहे.

– कल्याण-बदलापूर रस्त्यावर याच सिग्नलजवळ मोठ्या प्रमाणावर सांडपाणी साचत असल्याने, येथे थांबणाऱ्या वाहनचालकांना तीव्र दुर्गंधीचा सामना करत उभे राहावे लागत आहे.

– या गंभीर प्रश्नांवर अंबरनाथ नगर परिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून रस्ते दुरुस्त करणे आणि नागरिकांना दिलासा देणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अंबरनाथ आणि बदलापुरचे लोकप्रतिनिधी येथील खड्डे आणि सांडपाण्याच्या प्रश्नाकडे डोळेझाक करून केवळ प्रकल्पाच्या पाहणीचे सोपस्कार पार पाडत असल्याबद्दल वाहनचालक व नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.