बदलापूर : बदलापूर शहरात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शिवसेना शहर शाखा व वामन म्हात्रे फाऊंडेशन यांनी मिळून वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, यानिमित्त शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे व प्रलंबित समस्यांचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधारी भाजप व नगराध्यक्षांना थेट लक्ष्य केले. केवळ समाजमाध्यमांवर ‘रील्स’ काढून बदलापूर शहराचा विकास होणार नाही, असा सणसणीत टोला म्हात्रे यांनी लगावला.
पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांवरील खड्डे बुजवणे प्रशासनाचे काम होते, अशी आठवण त्यांनी करून दिली. सध्या अंबरनाथ व उल्हासनगरात शिवसेना-भाजप युतीची सत्ता असली तरी, बदलापूर नगरपालिकेत मात्र शिवसेना विरोधी बाकावर बसून भाजपला सातत्याने कोंडीत पकडत आहे.
सर्वसाधारण सभेतील कोट्यवधींच्या विषयपत्रिकांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या शिवसेनेने आता शहरातील मूलभूत प्रश्नांवरून रान उठवले आहे. वामन म्हात्रे यांनी शहरातील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधताना सांगितले की, शहरातील पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या एकमेव उड्डाणपुलावर सध्या मोठे खड्डे पडले असून, त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या खड्ड्यांतून प्रवास करताना नागरिक व विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत असून, समाजमाध्यमांवर प्रशासनाच्या कामगिरीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील उद्याने देखभालीअभावी भकास झाली असून त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक भागांतील पथदिवेही बंद अवस्थेत आहेत. या सर्व मूलभूत समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी सत्ताधारी केवळ मिरविण्यात मग्न असल्याचा आरोप त्यांनी केला. नगराध्यक्षा या थेट जनतेतून निवडून आल्या आहेत. त्यांनी कोणताही राजकीय भेदभाव न करता नि:पक्षपातीपणे शहराचा विकास करणे अपेक्षित आहे. मात्र, नगराध्यक्षा व पालिकेचे काही अभियंते यांच्या संगनमतातून शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागातील खड्डे जाणीवपूर्वक न बुजवण्याचे आदेश दिले जात असल्याचा अत्यंत गंभीर आरोप वामन म्हात्रे यांनी केला आहे.
जाणीवपूर्वक विकासकामे रोखली जात असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगराध्यक्षांनी केवळ मिरविण्यात व रील्स बनवण्यात गुंतून न पडता सार्वजनिक हित व नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.० म्हात्रे यांच्या या खरमरीत टीकेमुळे बदलापूर शहरातील राजकीय वातावरण व खड्ड्यांचे राजकारण आता तापण्याची चिन्हे आहेत.
शहरातील सर्व प्रभागांमध्ये खड्डे बुजवण्यासाठी दहा लाखांचा निधी देण्यात आला आहे. तसेच प्रशासकीय राजवटीत शेकडो कोटी खर्चून निकृष्ट डांबरीकरण करणारी आर. डी. कन्स्ट्रक्शन कंपनी कोणाची आहे याचा म्हात्रे यांनी शोध घ्यावा. त्यामुळे आज शहरात खड्डे पडले आहेत. – राजन घोरपडे, नगरसेवक भाजप
