बदलापूर: एक्सप्रेमध्ये शिरलेले अनधिकृत प्रवासी, त्यामुळे स्वच्छतागृहाकडे जाण्याचा बंद झालेला मार्ग, चोरीचे प्रकरण आणि रेल्वे प्रशासनाची दिरंगाई यामुळे हतबल प्रवाशांची संतप्त होऊन एक्सप्रेस थांबवली. स्थानकावर उतरून आपली तक्रार रेल्वे पोलिसांना करत असतानाच एक्सप्रेस त्याच प्रवाशांना सोडून निघाल्याची खळबळजनक घटना मध्य रेल्वेवरील बदलापूर रेल्वे स्थानकात समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हा सर्व गोंधळ बदलापूर रेल्वे स्थानकात झाला.

जोधपूर एक्सप्रेस रखडल्याने लोकल उशिरा आल्यामुळे लोकल प्रवाशांनी एक्सप्रेस प्रवाशांवर संताप व्यक्त केला. त्यामुळे रेल्वे स्थानकावर गोंधळाची स्थिती होती. अखेर मागून येणाऱ्या खोपोली गाडीने स्थानकात राहिलेल्या प्रवाशांना पुढे नेण्यात आले आणि त्यांना एक्सप्रेमध्ये बसवण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती.

बदलापूर रेल्वे स्थानकात शनिवारी मध्यरात्री अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. प्रवाशांनी पुण्याच्या दिशेने जाणारी जोधपूर एक्सप्रेस साखळी ओढून बदलापूर स्थानकात थांबवली. त्यामुळे जोधपुर एक्स्प्रेसच्या मागे असणाऱ्या लोकल गाड्या रखडल्या. त्यातील प्रवाशांनी स्थानकात येऊन रेल्वे पोलिसांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

यावेळी काही प्रवासी संंतप्त झाले होते. आम्ही सुरत पासून प्रवास करत आहोत, अशावेळी रेल्वेच्या डब्यांमध्ये आरक्षित तिकीट नसलेले अनेक प्रवासी शिरल्याने तिकीट धारक प्रवाशांना स्वच्छतागृहातही जाता येत नसल्याची ओरड प्रवासी करत होते. त्यातच एका चोराला आम्ही सुरत स्थानकातच पकडून दिले. त्यानंतरही चोरीची काही प्रकरणे झाली आहेत, असा आरोप यावेळी प्रवाशांनी केला.

रेल्वे पोलीस आणि तिकीट तपासणीस यांना तक्रार करूनही यावर तोडगा निघत नाही. आम्ही अनेकदा रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांकवरही संपर्क केला. मात्र तेथूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संतापातून आम्ही साखळी ओढल्याचे प्रवाशांनी सांगितले.

रेल्वेतील तिकीट तपासणीस यांनी आमची तिकिटे घेऊन रेल्वे प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर वलसाड येथील रेल्वे पोलिसांचे आम्हाला फोन येत आहेत. तुमचे विरुद्ध तक्रार आहे असे ते पोलीस सांगत आहेत आणि आम्हाला वलसाड येथे बोलवले जात आहे असा आरोप काही रेल्वे प्रवासी महिलांनी यावेळी केला.

रेल्वे स्थानकात एक्सप्रेस थांबल्याने त्यामागे लोकल गाड्याही रखडल्या होत्या. त्यातील काही प्रवासांनी पायी चालत बदलापूर स्थानक गाठले. स्थानकात कर्जत खोपोली वांगणी या लांबच्या भागात जाणाऱ्या अनेक प्रवाशांना तात्काळत उभे राहावे लागले. त्यामुळे लोकल प्रवाशांनी एक्सप्रेस प्रवाशांना संताप व्यक्त केला. हे दोन्ही प्रवासी बदलापूर रेल्वे स्थानकात आमने-सामने आले. त्यामुळे काही वेळ बदलापूर स्थानकात गोंधळाचे वातावरण होते.

प्रवासी आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चर्चा सुरूच असताना अचानक काही वेळ थांबलेली एक्सप्रेस गाडी सुरू झाली. संताप व्यक्त करण्यासाठी उतरणारे अनेक प्रवासी फलाटावरच राहिले आणि एक्सप्रेस कर्जतच्या दिशेने गेल्याने आणखी गोंधळ उडाला. अनेक प्रवाशांची ज्येष्ठ सहप्रवासी लहान मुले एक्सप्रेस मध्ये राहिल्याने एक्सप्रेसमध्ये गोंधळाची स्थिती होती. त्यावेळी प्रवाशांचा संताप आणखी अनावर झाला.

काही प्रवासी रेल्वे रुळांवरही उतरले मात्र मागून खोपोली लोकल येत असल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना तात्काळ फलटावर घेतले. यावेळी सुरक्षा जवानांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क करत याची माहिती दिली. मागून येणाऱ्या खोपोली लोकलमध्ये या प्रवाशांना बसवून एक्सप्रेस पर्यंत सोडण्यासाठी अनेक रेल्वे सुरक्षा दलाचे जवानही त्यांच्यासोबत मार्गस्थ झाले.

या सर्व गोंधळात बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. मोठा काळ मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे रात्री उशिरा घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल.