बदलापूर : शहरभरात भटके श्वान निर्बिजीकरण व लसीकरण प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने त्यांच्या टोळ्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात सध्या भटक्या श्वानांची दहशत पसरली आहे. गेल्या आठवड्यात एका महिलेला व एका तरुणीला श्वानदंशामुळे तातडीचे उपचार घ्यावे लागले.

गेले काही दिवस शहराच्या विविध भागांत, रहिवासी संकुलांबाहेर, रस्ते व चौकांमध्ये भटक्या श्वानांची संख्या वाढत आहे. पहाटे, वा रात्री उशिरा घरी परतणाऱ्या नागरिकांवर भटके श्वान धावून जाण्याच्या घटना घडतात. बदलापूर स्थानकातून उशिराने घरी परतणाऱ्या नोकरदारही या श्वानांच्या दहशतीखाली वावरत आहेत. रात्री उशिरा हे भटके श्वान पादचाऱ्यांच्या अंगावर धावून जातात. पहाटेच्या सुमारास बाहेर फेरफटका मारण्यासाठी निघणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही या भटक्या श्वानांचा धसका घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांनी थेट स्थानकावर प्रवेश मिळवल्याचे दिसून आले होते. ऐन गर्दीच्या वेळीही हे भटके श्वान फलाटावर निवांतपणे झोपून असतात. त्यामुळे उपनगरी रेल्वेगाड्यांतून उतरल्यानंतर वा चढताना प्रवाशांना फलाटांवरील श्वानांना ओलांडून जावे लागत आहे.

रात्रीच्या वेळी या भटक्या श्वांनाची भीती आणखीच वाढत आहे. एका भटक्या श्वानाने काही दिवसांपूर्वी बदलापूर स्थानकात एका महिला प्रवाशाला चावा घेतला. २५ सप्टेंबर रोजी ही घटना उघड झाली होती. रात्रीच्या वेळी महिलेच्या पायाला दोन ठिकाणी श्वानाने चावा घेतला. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी तात्काळ महिलेला बदलापुरातील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. संगिता भल्ला असे या महिलेचे नाव असून त्यांना दोन दिवसांच्या उपचारानंतर सोडून देण्यात आले.

त्यानंतर आणखी एका तरुणीवर भटक्या श्वानाने हल्ला केल्याचे समजते. त्यामुळे रेल्वे स्थानकात आधीच लोकल पकडून जागा मिळवण्याची स्पर्धा आणि ताणतणाव असताना प्रवाशांना या भटक्या श्वानांचाही सामना करावा लागत आहे.

सर्वच स्थानकांत भटके श्वान

बदलापूर स्थानकात महिलेला भटक्या श्वानाने चावा घेतला असता तरी बदलापूरसह अंबरनाथ, उल्हासनगर या स्थानकांवर भटक्या श्वानांचा वावर दिसून येत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे फलाटावर उभे राहणेही जिकीरीचे झाल्याचे एका प्रवाशाने सांगितले.