बदलापूर: रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोली, माथेरान तसेच आसपासच्या भागात गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उल्हास नदीने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी इशारा पातळी ओलांडली आहे. ठाणे पाटबंधारे मंडळाने सोमवार, ६ जुलै रोजी सकाळी ७ वाजता दिलेल्या अहवालानुसार, ठाणे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने बदलापुरात नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे पुराची भीती निर्माण झाली आहे.

उल्हास नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून नदीकाठच्या अनेक भागात तणावाचे वातावरण आहे. बदलापूर शहरात उल्हास नदीची धोक्याची पातळी १७.५० मीटर आणि इशारा पातळी १६.५० मीटर इतकी निश्चित करण्यात आली आहे. आज सकाळी नदीची पाणी पातळी १६.८० मीटरवर पोहोचली असून, नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. कल्याण ग्रामीण भागातही नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. जांभूळपाडा येथे धोक्याची पातळी १४.०० मीटर आणि इशारा पातळी १३.०० मीटर आहे. या ठिकाणी आजची पातळी १३.२० मीटर नोंदवली गेली असून, येथेही नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. मोहने येथे उल्हास नदीची पाणी पातळी ८.८३ मीटर इतकी आहे. ती ९.०० मीटर या इशारा पातळीच्या जवळ पोहोचली असली तरी, सध्यातरी ती इशारा पातळीपेक्षा कमी आहे. येथील धोक्याची पातळी १०.०० मीटर आहे.

उल्हास नदीसोबतच जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या नद्यांच्या पातळीतही वाढ पाहायला मिळत आहे. टिटवाळा येथे काळू नदीची इशारा पातळी १०२.०० मीटर आहे. आज सकाळी या नदीची पातळी बरोबर १०२.०० मीटरवर पोहोचली असून, या नदीनेही इशारा पातळी गाठली आहे. येथील धोक्याची पातळी १०३.५० मीटर आहे. सापगाव येथे भातसा नदीची पाणी पातळी सध्या ३२.४० मीटर इतकी आहे. ही पातळी ३६.०६ मीटर या इशारा पातळीपेक्षा आणि ३६.५५ मीटर या धोक्याच्या पातळीपेक्षा कमी असल्याने सध्यातरी येथे दिलासा आहे.

एकूणच बदलापूर आणि कल्याण ग्रामीण (जांभूळपाडा) भागात उल्हास नदीने, तसेच टिटवाळ्यात काळू नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, नागरिकांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बघ्यांची गर्दी

उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने अनेक नागरिक नदीचे वाढलेले पाणी पाहण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. बदलापुरात नव्या उल्हास नदीवरील पुलावर अनेक नागरिक आपली वाहने घेऊन छायाचित्र घेण्यासाठी येत असल्याचे दिसून आले आहे. त्या नागरिकांना माघारी परतण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जाते आहे. मात्र या बघ्यांच्या गर्दीमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती आहे.

यंत्रणा अलर्टवर

बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने येथील यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. कुळगाव बदलापूर नगर परिषद, अग्नीशमन दल, स्थानिक पोलीस आणि महसूल प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.