बदलापूर: गेल्या आठवडाभरापासून ठाणे जिल्ह्याला आणि विशेषतः बदलापूर-कल्याण परिसराला झोडपून काढणाऱ्या पावसाने कालपासून काहीशी विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर ओसरल्याने आणि उल्हास नदीची पाणीपातळी लक्षणीयरीत्या खाली आल्याने नदीकाठच्या नागरिकांनी मोठा सुटकेचा निश्वास सोडला आहे. असे असले तरी, धरण क्षेत्रात पाण्याची आवक सुरूच असून बारवी धरणाचा पाणीसाठा आता ५० टक्क्यांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
बुधवारी धरण क्षेत्रात तब्बल २४७.८० मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र गुरूवार, ९ जुलै रोजी पावसाचा जोर मंदावला असून धरण क्षेत्रात सरासरी ५७.२० मिमी पाऊस पडला आहे. पावसाचा वेग कमी झाला असला तरी, धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. गुरूवारी बारवी धरणातील जिवंत पाणीसाठा १६३.५८ दशलक्ष घनमीटर झाला होता. तर पाणीसाठा ४८.२७ टक्क्यांवर पोहोचला होता. धरणाची पाणीपातळी आता ६४.६२ मीटरवर पोहोचली आहे.
बारवीच्या पाणलोट क्षेत्रातील हंगामातील एकूण पावसाने हजाराचा टप्पा पार केला असून, तो आता १ हजार ०८२.८० मिमी इतका झाला आहे. धरणात वेगाने पाणी जमा होत असले, तरी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण अजूनही मागे आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ९ जुलै २०२५ रोजी धरणात ७०.२७ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. तर पावसाची एकूण नोंद १ हजार ५२३.०० मिलीमीटर इतकी होती.
ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने बुधवारी सकाळी ८ वाजता प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, पावसाचा जोर कमी झाल्याचा थेट आणि सकारात्मक परिणाम जिल्ह्यातील नद्यांवर पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून धोक्याची आणि इशारा पातळी ओलांडून वाहणारी उल्हास नदी आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. बदलापूर येथे उल्हास नदीची पातळी थेट दुपारी दोन वाजताच्या सुमारास १२ मीटरपर्यंत खाली आली होती. येथील इशारा पातळी १६.५० मीटर आहे.
जांभूळपाडा कल्याण ग्रामीण भागातही नदीची पातळी ११.७० मीटरवर आली होती. मोहने येथेही नदीची पातळी ६.५० मीटरपर्यंत खाली घसरली होती. उल्हास नदी आणि भातसा नदी शांत असल्या तरी, टिटवाळा येथील काळू नदीने मात्र अद्याप आपली इशारा पातळी ओलांडलेली होती.
इतर धरणातही समाधानकारक पाणी
जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी इतर धरणेही चांगल्या पावसात भरलेली आहेत. गुरूवारी भातसा धरणात ५६.३७ टक्के, तानसा धरणात ७७.४८ टक्के, तर मोडक सागर धरणात तब्बल ८२.६६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली असून, बारवी धरणातील ४८ टक्क्यांवरील साठ्यामुळे आगामी काळातील पाणीटंचाईचे सावट कमी होणार आहे.
त्या महिलेचा शोध नाहीच
बुधवारी बदलापुरातील उल्हास नदीवरील जुन्या पुलावरून थेट नदीत उडी घेणाऱ्या महिलेचा शोध अग्नीशमन दलाच्या जवानांनी गुरूवारी पाणी ओसरल्यावरही घेतला. झाडे झुडपांत, नदी पात्रात शोध घेऊनही त्यांचा शोध लागला नसल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान आक्काताई पाडाळकर असे त्यांचे नाव असून त्या मानसिक आजाराशी झुंजत होत्या, अशी माहिती बदलापूर पश्चिम पोलिसांनी दिली आहे.
