बदलापूरः तुमच्या मोबाईलवरून ४० महिलांना अश्लील संदेश पाठवण्यात आले असून त्यांना व्हिडीओ कॉलही करण्यात आले आहेत. तुमच्या एटीएम कार्डचा, आधार कार्डचा वापर करून मनी लॉंडरिंग करण्यात आली आहे. तुमच्याविरूद्ध सीबीआयचा तपास सुरू असून तुमचा इन्काऊंटरही होऊ शकतो, अशी भीती दाखवून बदलापुरातील एका निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला तब्बल १ कोटी ५६ लाख ४५ हजारांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे.
याचप्रकारची एक बातमी वृत्तपत्रात वाचल्यानंतर आपल्या प्रकाराशी साम्य असल्याचे जाणवताच आपली फसवणूक झाल्याचे या निवृत्त कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली असून हा नियोजनबद्ध फिल्मी स्टाईल फसवणुकीचा प्रकार असल्याचे समोर आले आहे.
कशी झाली वृद्ध व्यक्तीची फसवणूक?
संबंधित निवृत्त कर्मचाऱ्याला १२ फेब्रुवारी रोजी मोबाईलवर एक फोन आला. तुमच्या मोबाईलवरून ४० महिलांना अश्लील संदेश आणि व्हिडीओ कॉल करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर फोनमध्ये मुंबई गुन्हे शाखेचे नाव सांगत एकाने त्यांच्याकडून आधारकार्ड व इतर वैयक्तिक माहिती घेतली. तसेच त्यांच्या पत्नीच्या मोबाईलमध्ये सिग्नल नावाचे एक ऍप डाउनलोड करण्यास सांगून त्याद्वारे बनावट एफआयआर, इंटरपोलची रेड नोटीस, बँकेचे कागदपत्रे आणि विविध आधारकार्डच्या प्रती पाठवण्यात आल्या. तर फसवणूक करणाऱ्यां आरोपींनी स्वतःला पोलीस अधिकारी, सीबीआय अधिकारी आणि न्यायालयातील न्यायाधीश असल्याचे सांगत त्यांना व्हिडिओ कॉलवर वेळोवेळी भीती दाखवत काही गोष्टी लिहून घेतल्या. एका मनी लॉन्डरिंग प्रकरणात संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड, एटीएम कार्ड वापरल्याचे भासवून त्यांना घाबरवण्यात आले.
तसेच २५ लाख तुमच्या खात्यात आले असून ते पैसे तुम्हाला सोडून द्यावे लागतील. त्यानंतर ते पैसे पुन्हा तुमच्या खात्यात येतील असेही सांगण्यात आले. मुक्ततेसाठी बँक खात्यावर तब्बल १ कोटी ५६ लाख ४५ हजार पाठवण्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे सर्व खात्यातील पैसे एका खात्यात जमा करून ते पैसे विशिष्ट खात्यात पाठवण्याचे सांगण्यात आले. तसेच घरातील सोन्याबाबत खोटे सांगून सोने गहाण ठेवून १५ लाखही देण्यास भाग पाडण्यात आले.
…आणि फसवणूक झाल्याचं लक्षात आलं!
काही दिवसात पैसे परत मिळतील असे आश्वासन दिल्याने मुदतीनंतर संबंधित निवृत्त कर्मचाऱ्याने आरोपींच्या क्रमांकावर संपर्क साधण्यास सुरूवात केली. मात्र सुट्टी आहे एक दोन दिवसात पैसे येतील असे त्यांना सांगण्यात आले. याच दरम्यान, वर्तमानपत्रात आभासी अटकेबाबत बातमी वाचल्यानंतर त्या निवृत्त कर्मचाऱ्याला आपण फसवणुकीचे बळी ठरलो असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. एखाद्या चित्रपटाला साजेशा असा हा फसवणुकीचा प्रकार असून आभासी अटकेचा बनाव करत पुन्हा एकदा एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत सातत्याने जनजागृती केली जाते. मात्र त्यानंतरही असे प्रकार होत असल्याने चिंता व्यक्त होते आहे.
