बदलापूर : बदलापूर शहरात रस्ते रुंदीकरणासह चौक विस्तारीकरणाचे काम गेल्या काही वर्षांत पूर्ण करण्यात आले. मात्र, या रस्त्यालगत असलेले विद्युत खांब व रोहित्र रस्त्याच्या मधोमध ठेवण्यात आले आहेत. ते हटवण्यासाठी स्थानिक नगर परिषद प्रयत्न करत असली तरी संपूर्ण निधीची मागणी करत महावितरण या कामात दिरंगाई करीत असल्याचा आरोप केला जात आहे. भर रस्त्यातील खांबांमुळे अपघात होण्याची भीतीही वाढली आहे.

ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या केंद्र शासनाच्या योजनांचा आढावा घेणाऱ्या बैठकीतही रोहित्र व विद्युत खांबांच्या स्थलांतरणाचा विषय गाजला होता. विविध नगर परिषदा व महापालिकांनी रस्ते व चौकांचे रुंदीकरण केले. मात्र, जुन्या रस्त्यांलगत असलेले खांब अगदी रस्त्याच्या मध्यभागी आले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

हे खांब हटवण्यासाठी महावितरणाने वेळीच काम करण्याची गरज व्यक्त केली गेली. महावितरण हे काम करत नसल्यास स्थानिक नगर परिषदा, महापालिकांना त्यांनी मार्गदर्शन करावे, असेही सांगण्यात आले. मात्र, त्यानतंरही विविध शहरांत हा प्रश्न यथास्थिती आहे.

कुळगाव-बदलापूर नगर परिषद क्षेत्रात रस्ते रुंदीकरण व चौक विस्तारीकरणाच्या कामांनंतरही विद्युत खांब व रोहित्र हटवले न गेल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या विद्युत खांबांच्या आडोशाला वाहनचालक वाहने उभी करतात. वाहनतळ म्हणून अशा जागेचा वापर केला जात आहे.

याबाबत स्थानिक नगर परिषद सातत्याने पाठपुरावा करत असली तरी त्यांना यश येताना दिसत नाही. नगर परिषदेने शहरातील चार रोहित्र स्थलांतरणाचा प्रस्ताव महावितरणाकडे सादर केला होता. मात्र, दोन वर्षांनंतरही एकाच रोहित्राचे स्थलांतर करण्यात आले आहेत. याबाबत महावितरणाला विचारले असता संपूर्ण निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत स्थलांतर करता येणार नाही असे सांगितले जाते. मात्र जितका निधी आहे तितक्या अडचणी स्थलांतरीत करण्याची गरज आहे, अशी नगर परिषद प्रशासनाची भूमिका आहे. यावर तोडगा निघत नसल्याने नगर परिषद प्रशासनही हतबल असल्याचे चित्र आहे.

पालिका स्वखर्चाने स्थलांतरणास तयार याबाबत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी संपर्क केला असता, आम्ही याबाबतचे प्रस्ताव महावितरणाला यापूर्वीच सादर केले होते. दीड वर्षांनंतर आता विद्युत खांब स्थलांतरणाचा प्रस्ताव मंजुर झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यात दिरंगाई होत असल्यास आम्ही स्वखर्चानेही हे स्थलांतर करू शकतो असा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. याबाबत महावितरणाची भूमिका कळू शकलेली नाही.