बदलापूर : गणेशमूर्ती निर्मितीपासून विसर्जनापर्यंत व विसर्जनानंतरही पर्यावरण संवर्धनाचा विचार कृतीत आणण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरिया व रोटरी आदर्श व्यवसाय कौशल्य विकास केंद्र यांनी मिळून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन केले.

शाडू मातीचा नव्याने वापर करून पुढील वर्षी त्याच मातीतून गणेशमूर्ती साकारण्याची संकल्पना या उपक्रमातून मांडण्यात आली. रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरिया व रोटरी आदर्श व्यवसाय कौशल्य विकास केंद्र यांच्या वतीने २२ व २३ ऑगस्ट रोजी गणेशमूर्ती निर्मिती, तर ३० ऑगस्ट रोजी रंगकामाचे प्रशिक्षण देण्यात आले. तीन दिवसांच्या या कार्यशाळेत बदलापूर शहरातील विविध वयोगटांतील नागरिकांसह लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.

मूर्तिकार संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी सदस्यांनी शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारल्या. मूर्तीची प्रमाणबद्ध रचना, सोंडेची निर्मिती, चेहऱ्याची ठेवण, अलंकार व दागिन्यांची रचना तसेच मूर्तीला अंतिम स्वरूप देताना घ्यावयाची काळजी याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी सहभागी सदस्यांनी स्वतःच्या मूर्तींना रंगकाम करून अंतिम स्वरूप दिले.

पर्यावरणाची जबाबदारी प्रत्येकाची असून गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. आपल्या हाताने गणेशमूर्ती साकारण्याची संधी मिळाल्याने सहभागी सदस्यांनी आनंद व्यक्त केला. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जनार्दन घोरपडे यांनी कार्यशाळेला भेट देऊन सहभागींचे कौतुक केले. नागरिकांनीही उपक्रमाला भेट देत सहभागींचे अभिनंदन केले. कार्यशाळेचे प्रकल्प प्रमुख शलाका मानगेकर, जीवन पांचाळ आणि शशांक सिनालकर यांनी नियोजन व अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली. अध्यक्ष डॉ. अमोल उबाळे आणि सेक्रेटरी वीणा पढेर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.

विसर्जनानंतर मातीचा पुनर्वापर

या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणून सहभागी सदस्यांच्या घरी जाऊन गणेशमूर्तीचे दर्शन घेण्याबरोबरच घरच्या घरी विसर्जन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. विसर्जनानंतर उरलेली शाडू माती रोटरी क्लबच्या वतीने संकलित करून मूर्तिकार संतोष साबळे यांच्याकडे सुपूर्द केली जाणार आहे. पुढील वर्षी याच मातीचा गणेशमूर्ती निर्मितीसाठी पुनर्वापर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणजे केवळ शाडू मातीची मूर्ती तयार करणे नव्हे. मूर्तीपासून विसर्जनापर्यंत व विसर्जनानंतरही पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे ही आमची संकल्पना आहे. – डॉ. अमोल उबाळे, अध्यक्ष