बदलापूरः बदलापूर शहरात एका इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा बस चालकानेच विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय बस चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये महिला मदतनीस अनिवार्य असतानाही महिला मदतनीस नसल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बस मालक आणि शाळा व्यवस्थापनालाही नोटीस बजावली आहे. गेल्याच महिन्यात एका शाळेच्या व्हॅनमध्ये चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा असाच प्रकार घडल्याने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कायद्याचे पालन करण्याची सक्ती कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

गेल्या दोन वर्षात बदलापूर शहरातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या लैंगिक अत्याचार आणि विद्यार्थीनींच्या विनयभंगाच्या घटनांवरून संतापाचे वातावरण असताना या घटना मात्र थांबताना दिसत नाहीत. गेल्या महिन्यात एका चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यानंतर राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी बदलापुरात भेट देत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना कठोर नियम लागू करण्याचे संकेत त्यांनी दिले होते. मात्र त्यानंतरही बदलापूर शहरात शाळेच्या वाहनांमध्ये सुरक्षा साधनांची उपलब्धता झालेली नाही. तसेच पालकांकडूनही खासगी वाहनांतून कोणत्याही सुरक्षा खात्रीशिवाय मुलांची वाहतूक सुरूच ठेवल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थीनीच्या विनयभंगाचा प्रकार बदलापुरात समोर आला आहे. बुधवारी शाळा सुटल्यानंतर सायंकाळी विद्यार्थीनी घरी जाताना वार्तालाप करत बस चालकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केला. विद्यार्थीनीने ही घटना आपल्या पालकांना सांगितली. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात संबंधित बस चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ वांगणीत राहणाऱ्या संबंधित आरोपी बस चालकाला अट केली आहे. हा बस चालक गेल्या आठ वर्षांपासून बसवर चालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बसची मालक महिलाच बसवर मदतनीस म्हणून कार्यरत होती. घटनेच्या दिवशी आरोग्याच्या कारणास्तव महिला अनुपस्थित होती. त्याच दिवशी ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस प्रशासन विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन तपास करत आहेत. तर शाळा प्रशासन आणि बस मालक यांनाही नोटीस देऊन चौकशीला बोलवण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे.

वाहनांची तपासणी, चालकांची चारित्र्य पडताळणीचे काय ?

विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी २३ जानेवारी रोजी बदलापुरात भेट देत चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणाची माहिती घेतली होती. यावेळी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीदरम्यान घ्यावयाच्या काळजीबाबत अंमलबजावणी झाली असती तर घटना घडली नसती, असे मत मांडले होते. त्यानंतर वाहनांच्या तपासणीसोबतच, वाहन चालकांची चारित्र्य पडताळणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र असे काहीच अद्याप झालेले नाही. महिला मदतनीसांच्या अनुपस्थितीच्या दिवशीच घडलेली ही दुसरी घटना आहे. त्यामुळे बस मालक, शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत खरच गंभीर आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.