बदलापूर – आदर्श शाळेतील दोन लहान मुलींच्या अत्याचाराप्रकरणात शाळा आणि पोलीस प्रशासनाचा अक्षम्य निष्काळजीपणा समोर आल्यानंतर आता उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात चिमुकलीला तपासणीसाठी तीन दिवस फेऱ्या माराव्या लागल्याचे समोर आले आहे. डॉक्टर उपलब्ध नाहीत, तपासणीसाठी उद्या या, अशी उत्तर देत रुग्णालय व्यवस्थापनाने पालकांना तीन दिवस रुग्णालयात बोलवल्याचे खुद्द रुग्णालय अधीक्षकांनीच सांगितले आहे. त्यामुळे हा हलगर्जीपणा असल्याचा आरोप आता होतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर येथील आदर्श शाळेत शिकणाऱ्या चार वर्षीय आणि पाऊणे चार वर्षीय दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरुद्ध संपूर्ण देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत . तर मुलींच्या अत्याचाराचे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर देखील मुलीच्या खाजगी भागात झालेल्या जखमा या सायकल चालविल्यामुळे झाल्या असाव्यात असा संतापजनक दावा मुख्याध्यापकांनी करत याप्रकरणी आपली उदासीनता दाखवली. तर पोलिसांनी छळ केल्याचा आरोप पालकांनी केला होता. यामुळे सर्वच स्तरातून आता शाळा आणि पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. असे असतानाच आता पालक आपल्या पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी शासकीय रुग्णालयात फिरत असताना या व्यवस्था किती हलगर्जी आणि अपुऱ्या असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

हेही वाचा – शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी

बदलापुरातील उपजिल्हा रुग्णालयात या मुलीची वैद्यकीय तपासणीच होऊ शकली नाही. त्यामुळे उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात गेले असता त्यांना आपल्या पाल्याच्या वैद्यकीय अहवालासाठी तीन दिवस फेऱ्या माराव्या लागल्या अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. आज तुमच्या मुलीच्या तपासणीसाठी रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नाहीत, असे असंवेदनशील उत्तर देत रुग्णालय व्यवस्थापनाने पालकांना चक्क घरी माघारी पाठवले. तसेच या तपासणीवेळी पोलीस अधिकारी देखील तातडीने रुग्णालयात हजर राहणे गरजेचे होते. मात्र पोलिसांनी देखील यावेळी दिरंगाई केली. त्यामुळे रुग्णालयातील सर्व संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच सर्वांवर गुन्हा दाखल व्हावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.

नेमके झाले काय ?

१६ ऑगस्ट रोजी पीडितेच्या पालकांचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर रात्रीच त्यांनी बालिकेला बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. मात्र तेथे अपुऱ्या सुविधेअभावी ग्रामीण रुग्णालयाने उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले. मात्र रात्री त्या ठिकाणी तपासणी करण्यात नाही आली. त्यानंतर पालक १७ ऑगस्ट रोजी तपासणीसाठी रुग्णालयात गेले. मात्र तेव्हाही त्यांना दिवसभर पोलीस अधिकारी आले नसल्याने ताटकळत बसावे लागले. तर रविवारी, १८ ऑगस्ट रोजी पालक तपासणीला गेले असता आज तपासणीसाठी डॉक्टर उपलब्ध नाहीत उद्या या, असे उत्तर देण्यात आले. अशा प्रकारांमध्ये पीडितांना तातडीने रुग्णालयात दाखल करून घ्यावे लागते. जेणेकरून सर्व चाचण्या जलदगतीने होतात आणि अहवाल तातडीने येतो. मात्र बदलापूरच्या या प्रकरणात अशा पद्धतीचे कोणतीही पाऊले उचलली गेली नाहीत. कनिष्ठ डॉक्टरांकडून अशा पद्धतीची कार्यवाही झाल्याने रुग्णालय व्यवस्थापनाने त्यांना सक्तीची नोटीस बजावली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालयात अशी प्रकरणे आल्यास त्यासाठीची सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. तसेच कोणत्याही शासकीय रुग्णालयात पीडितांची तपासणी करण्यात दिरंगाई करण्याचा कोणताही अधिकारी नाही. – अँड. पल्लवी जाधव, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, ठाणे</p>

हेही वाचा – डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या नराधामाला नाशिकमधून अटक

बालिकेला तपासणीसाठी तीन दिवस यावे लागले. मात्र डॉक्टरांची उपलब्धता यामुळे त्यांना दोनदा बोलावले. रविवारी डॉक्टर उपलब्ध नसल्याने सोमवारी बोलावले. आता संबंधित कर्मचाऱ्यांना केलेल्या प्रक्रियेबद्दल विचारणा केली आहे. – डॉ. मनोहर बनसोडे, वैद्यकीय अधीक्षक, मध्यवर्ती रुग्णालय, उल्हासनगर.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur school case after the abuse the parents had to go to hospital three times for medical examination of victim girl ssb
Show comments