ठाणे : बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेतील त्या दुर्दैवी घटनेनंतर पीडित मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने उचलण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दोन वर्षे उलटूनही ही मदत प्रत्यक्षात मिळालेली नसल्याने कुटुंबाची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे शाळेची थकलेली फी भरण्यासाठी शाळेकडून त्यांना वारंवार तगादा लावला जात आहे. शिक्षणासारख्या मूलभूत हक्कासाठीच धडपड करत असलेल्या या पीडितेला मनसेकडून मदतीचा हात देण्यात आला आहे.
राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेतील त्या दुर्दैवी घटनेला आता दोन वर्षांचा काळ लोटला आहे. शिक्षणाच्या हक्कासाठी एका लहान मुलीचा सुरू असलेला संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. शाळेत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर या विद्यार्थिनीच्या शिक्षणाची जबाबदारी शासन उचलणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ही मदत अद्याप पूर्णपणे मिळालेली नसल्याने तिच्या कुटुंबाची चिंता वाढली आहे.
बदलापूर घटनेनंतर तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनी या चिमुरडीच्या १० वी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च शासन करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, वर्ष उलटले तरी या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. पीडित मुलीच्या वडिलांनी प्रशासनाकडे वारंवार दाद मागितली, मात्र त्यांना शिक्षण विभागाकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही. उलट, शाळेची थकलेली फी भरण्यासाठी शाळेकडून त्यांना वारंवार तगादा लावला जात होता, असा आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी केला आहे. या गंभीर विषयाप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून जाब विचारला आहे. शासनाने पीडित मुलीच्या शिक्षणाबाबत दिलेल्या वचनाची तातडीने पूर्तता करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
आश्वासन हवेतच
दरम्यान, बदलापूर प्रकरणातील पीडित मुलीच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारली आहे, अशी घोषणा तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. याशिवाय, त्यांच्या पालकांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत करत, त्यांना शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी विशेष सहकार्य केले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दोन वर्षांचा काळ लोटला तरी अद्यापही शिक्षण विभागाला जाग आलेली नाही. एकीकडे न्याय मिळवण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू असताना, दुसरीकडे शिक्षणासारख्या मूलभूत हक्कासाठीही पीडित कुटुंबाला वणवण फिरावे लागत आहे. या घटनेने प्रशासकीय यंत्रणेच्या संवेदनशीलतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
मुलीच्या वडिलांनी मनसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे आपली व्यथा मांडली आहे. मुलीच्या भविष्यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. शासनाने दिलेल्या आश्वासनांनुसार मदत मिळावी, जेणेकरून तिचे शिक्षण खंडित होणार नाही, अशी भावनिक विनंती त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे एका पालकाची असहाय्यता आणि मुलीच्या शिक्षणासाठीची झुंज स्पष्टपणे दिसून येते.
मनसेचा मदतीचा हात
आपल्या मुलीचे भविष्य अंधारात असल्याचे पाहून हतबल झालेल्या वडिलांनी अखेर मनसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्याशी संपर्क साधला. पाचंगे यांनी तत्काळ संवेदनशीलता दाखवत हायस्कूलची गतवर्षाची थकलेली ३२,००० रुपयांची फी स्वतःच्या खिशातून चेकद्वारे भरली आहे. एकीकडे सरकार समृद्ध राज्याच्या गप्पा मारते आणि दुसरीकडे एका अन्यायग्रस्त चिमुरडीला दिलेल्या शब्दाला जागत नाही, ही लाजीरवाणी बाब आहे, अशी टीका पाचंगे यांनी केली आहे.
