बदलापूरः बदलापूर शहरात गुरूवारी एका चिमुकलीवर शाळेच्या व्हॅनमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर सुरूवातीला या प्रकरणात अलिप्त असलेल्या शाळा प्रशासनही आता चौकशीच्या फेऱ्यात येणार आहे. शाळेचे मालक, शिक्षक आणि व्यवस्थापनाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले होते.

ज्या व्हॅनमध्ये ही घटना घडली त्या व्हॅनची न्यायवैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या वाहनाला वाहतूक परवाना नव्हता त्यामुळे वाहनाला २४ हजारांची दंड ठोठावत त्याचा परवाना निलंबीत करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश बाल हक्क आयोगाकडून देण्यात आले आहेत.

गुरूवारी दुपारी एका खासगी शाळेतील चार वर्षीय चिमुकलीवर व्हॅनमध्ये चालकानेच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात व्हॅनचालक हा शाळेशी संबंधित होता. मात्र शाळेने यात हात वर केल्याचा आरोप होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात शाळेचे मालक, व्यवस्थापक आणि शिक्षकांचीही चौकशी करणार असल्याचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी स्पष्ट केले आहे.

ज्या व्हॅनमध्ये ही घटना घडली त्या व्हॅनचीही न्यायवैद्यक तपासणी करण्यात आली. या व्हॅनला शालेय वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. त्यानंतरही ही व्हॅन शाळेच्या सेवेत विद्यार्थ्यांची वाहतूक करत होती. त्यामुळे या व्हॅनला २४ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दरम्यान शहरात आजही मोठ्या संख्येने अशा खासगी व्हॅन किंवा वाहनांतून होणारी शालेय मुलांची वाहतूक रडारवर आली आहे.

या घटनेची दख घेतल बालहक्क आयोगाच्या सचिवांनी बदलापुरात भेट दिली. या भेटीत घेतलेल्या माहितीचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येणार आहे. तर गट शिक्षण अधिकाऱ्यांकडूनही या घटनेचा वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. यासह या शिशु शाळेच्या संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे पत्र पोलिसांना देणार असल्याची माहिती गट शिक्षण अधिकारी विशाल पोटेकर यांनी दिली आहे.

त्या शाळा अखत्यारितच नाहीत

ज्या शाळेच्या वाहनात हा प्रकार झाला त्या शाळा शिक्षण विभागाच्या अखत्यारित येत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशा शाळांवर चौकशी करायची कुणी आणि त्यांच्या संचलनावर लक्ष ठेवणार कोण असा प्रश्न निर्माण होतो आहे. अनधिकृत शाळांबाबत प्रश्नावर बोलताना गटशिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्या अखत्यारितील १० शाळांवर कारवाई केल्याची माहिती देण्यात आली. मात्र या शाळा कुणाच्या तरी अखत्यारित द्या अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संगिता चेंदवणकर यांनी केली.

तिथे चोख बंदोबस्त

बदलापुरातील या अत्याचार प्रकरणानंतर संबंधित शाळेबाहेर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेरही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.