बदलापूर : गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरात सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे शहरातील नागरिक हैराण असून त्याचा फटका शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेलाही बसला आहे. याच्या निषेधार्थ बुधवारी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करत प्रश्नांची सरबत्ती केली.
येत्या तीन दिवसात जल शुद्धीकरण केंद्राला होणाऱ्या विजेचा प्रश्न निकाली निघणार असून पूर्वेतील वीज समस्येवरही आठव़डाभरात दिलासा मिळेल असे आश्वासन यावेळी महावितरणाचे कार्यकारी अभियंते आनंद काटकर यांनी दिले.
बदलापूर शहरातील वीज आणि पाणी प्रश्नावर बुधवारी शिवसेनेच्या (शिंदे) माध्यमातून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहराती गेल्या काही दिवसांपासून वीज समस्येमुळे पाणी प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे महावितरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना जाब विचारण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वात माजी गटनेते श्रीधर पाटील, अरूण सुरवळ, तुकाराम म्हात्रे, बाळा कांबरी यांच्यासह अनेक माजी नगरसेवक आणि महिला मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. डोक्यावर हंडा घेऊन महिलांनी महावितरण आणि जीवन प्राधिकरणाचा निषेध केला.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात महावितरणाचेही अधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरण आणि जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. महावितरणाकडे यंत्रणा नाही, कर्मचारी नाहीत, साधने नाहीत त्यामुळे १० मिनिटांच्या कामासाठी तासभर वेळ जातो. त्यामुळे ही महावितरण निर्मित कृत्रिम समस्या आहे असा आरोप श्रीधर पाटील यांनी केला.
तर वारा, पाऊस नसतानाही वीज खंडीत होतेच कशी असा प्रश्न वामन म्हात्रे यांनी उपस्थित केला. जीवन प्राधिकरणाकडे पर्यायी विद्युत व्यवस्था नाही, जनरेटर नाही त्यामुळे त्यांनी साधने उपलब्ध करावीत असेही म्हात्रे म्हणाले.
वीज अखंडीत द्या, पाणी मिळेल
वीज पुरवठा अखंडीत राहिला तर पाणीही मिळेल. वीज पुरवठा खंडीत झाल्यास पुन्हा पाणी उचल प्रक्रिया सुरू होण्यास वेळ जातो, अशी माहिती जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता सुरेश खाद्री यांनी आंदोलकांना दिली. तसेच जनरेटर उपलब्ध झाल्यास पर्यायी व्यवस्थाही होईल असेही खाद्री म्हणाले.
आठवडाभरात दिलासा मिळेल
बदलापूर पूर्वेला ज्या आनंद नगर येथील ५० मेगाव्हॅट रोहित्रातून वीज पुरवठा होत होता. त्या बिघाड झाल्याने समस्या उद्भवली आहे. मात्र येत्या दोन दिवसात ही समस्या संपेल. तर जांभूळ ते सोनिवली स्वतंत्र वीज वाहिनी टाकून पर्याय उपलब्ध केला जाईल. तसेच जल शुद्धीकरण केंद्रांना पर्यायी जोडणी दिली जाईल, असे आश्वासन यावेळी बदलापूर विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांनी आंदोलकांना दिले.
बदलापूर शहरातील वीजेचा आणि पर्यायाने पाण्याचा प्रश्न गेल्या काही दिवसात गंभीर झाला आहे. बदलापूर पूर्वेतील महावितरणाची स्थिती गंभीर आहे. सातत्याने खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांत संताप आहे. दैनंदिन कामकाजावरही त्याचा परिणाम झाला आहे. झोपेचेही तीनतेरा या वीजेच्या खेळखंडोब्यामुळे वाजले आहेत.
सर्वसामान्य नागरिकांसह शासकीय आस्थापना, पोलीस ठाणे, खासगी कार्यालयांनाही याचा फटका बसतो. त्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वीज पुरवठ्यालाही फटका बसत असल्याने शहरातील पाणी वितरण व्यवस्था बिघडली आहे.