बदलापूरः बदलापूर रेल्वे स्थानकातून सुटणारी ८ वाजून १० मिनिटांची लोकल पकडताना एका महिलेचा पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. फलाट क्रमांक एकवर हा प्रकार समोर आला. यात २८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून ती बदलापूर पूर्वेतील ज्युवेली परिसरात राहत होती. हा अपघात कसा घडला याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या घटनेमुळे हळहळ व्यक्त होते आहे.

बदलापूर रेल्वे स्थानक हे गेल्या काही वर्षात सर्वाधिक वर्दळीचे आणि गर्दीचे रेल्वे स्थानक बनले आहे. बदलापूर शहराची लोकसंख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दररोज काही कुटुंब येथे कायमस्वरूपी स्थलांतरीत होतात. नोकरी, व्यवसाय किंवा धंद्यासाठी बदलापूर रेल्वे स्थानकातून रेल्वे प्रवास करावा लागतो. बदलापूर शहरात नोकरदार वर्गाची संख्या मोठी आहे. यांच्या कार्यालयीन वेळाही एकच आहेत. त्यामुळे सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत बदलापूर रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने सुटणाऱ्या लोकल गाड्या भरभरून चालतात.

लोकलची संख्या मर्यादीत असल्याने अनेकदा लोकल ट्रेन खच्चून भरतात. प्रवासी लटकून थेट ठाणे, मुंबईपर्यंतचा प्रवास करतात. अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून लोकल ट्रेन पकडतात. त्यामुळे अनेकदा अपघात होतात. शनिवारी कमी वर्दळीच्या दिवशीही अशाच एका घटनेत एका २८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी सुटणारी बदलापूर लोकल सर्वाधिक गर्दीची लोकल म्हणून ओळखली जाते. या लोकलमध्ये जागा मिळवण्यासाठी स्थानकावर प्रवाशांमध्ये मोठी स्पर्धा असते. काही डब्ब्यांमध्ये रांगेत डब्ब्यात प्रवेश मिळवला जातो. मात्र काही डब्ब्यात प्रथम येणाऱ्या जागा अशा पद्धतीने जागा मिळते. त्यामुळे द्वितीय श्रेणीच्या डब्ब्यात मोठा संघर्ष दिसतो.

शनिवारी एक महिला अशाच प्रकारे लोकल पकडण्याच्या प्रयत्नात खाली पडली. त्यामुळे तीला जबर मार लागला. यातच त्या महिलेचा मृत्यू झाला अशी माहिती सहप्रवाशांनी दिली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. ही महिला ठाण्याच्या दिशेला दररोज प्रवास करत असायची, अशी माहिती मिळते आहे. या अपघातामुळे त्या महिलेच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

सुरक्षित लोकलप्रवास कधी?

शुक्रवारी सकाळी शीव स्थानकाजवळ गर्दीमुळे लोकलमधून तीन प्रवासी पडल्याची घटना समोर आली होती. तर गेल्याच आठवड्यात गर्दीच्या रेट्यात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीतून एका प्रवाशाने दुसऱ्याला भोसकल्याचे दिसून आले होते. त्यामुळे एका प्रवाशाचा मृत्यूही झाला. त्यामुळे लोकल प्रवास कोणत्या न कोणत्या कारणाने असुरक्षित बनला आहे. लोकलच्या वेळा, वाढणारी गर्दी, सुरक्षिततेचा अभाव यामुळे हा प्रवास सुरक्षित होणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.