बदलापूर : शहरात भटक्या श्वानांची वाढती संख्या आणि त्यातून घडणाऱ्या चाव्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कुळगाव बदलापूर नगरपरिषदेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भटक्या श्वानांसाठी सुसज्ज निवारा उभारणे तसेच प्रत्येक प्रभागात स्वतंत्र श्वान खाद्य ठिकाण निर्माण करण्याच्या दीड कोटी रुपयांच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

या निवाऱ्यात भटक्या श्वानांसाठी सुरक्षित वास्तव्य, अन्न-पाण्याची सोय, वैद्यकीय तपासणी आणि लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कात्रप परिसरात पाण्याच्या टाकीजवळ कार्यरत असलेल्या श्वान निर्बीजीकरण केंद्रालगत सर्व सुविधांनी सुसज्ज असे निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे.

शहरात मोकाट श्वानांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. काही प्राणीप्रेमींकडून रस्त्यांवर व सार्वजनिक ठिकाणी श्वानांना अन्न देण्यात येते. मात्र त्यामुळे नागरिक आणि प्राणीप्रेमी यांच्यात वादावादीचे प्रसंग उद्भवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागात किमान दोन ते चार श्वान खाद्य ठिकाण निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही स्थळे निवासी वस्त्यांपासून दूर, मोकळ्या जागेत उभारली जाणार असून तेथेच श्वानांना अन्न देण्याची परवानगी असेल. संबंधित व्यवस्था सुरू झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतरीत्या अन्न देणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्बीजीकरण मोहिमेलाही वेग देण्यात आला आहे. यासाठी मे. प्रतापराव राणे चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून कात्रप येथे उभारलेल्या केंद्रात निर्बीजीकरण शस्त्रक्रिया, लसीकरण आणि रेबिज प्रतिबंधक उपाययोजना केल्या जातात. या केंद्रात मोठ्या प्रमाणावर पिंजऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे आणि टप्प्याटप्प्याने अधिकाधिक श्वानांवर उपचार केले जात आहेत.

दरम्यान, शाळा, रुग्णालये, क्रीडांगणे आणि सार्वजनिक संस्थांच्या परिसरातही मोकाट श्वानांचा वावर आढळून आल्याने नगरपरिषदेकडून विशेष सर्वेक्षण करण्यात आले. संबंधित संस्थांना आवाराभोवती सुरक्षित कुंपण किंवा जाळी बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा परिसरातील श्वानांचे निर्बीजीकरण करून त्यांना नव्याने उभारण्यात येणाऱ्या निवाऱ्यात ठेवण्याची कार्ययोजना आखण्यात आली आहे.

मोकाट श्वानसंख्या १० हजारांवर

श्वानांचे लसीकरण करणे, निर्बिजीकरण करणे, शस्त्रक्रिया करणे व रेबिज प्रतिबंध लस देण्यासाठी कात्रप येथे उभारण्यात आलेल्या श्वान निर्बीजीकरण केंद्रात शस्त्रक्रिया केल्या जातात. या केंद्रामध्ये ९०९ पिंजरे बसविण्यात आलेले आहेत. सद्यस्थितीत नगरपरिषद क्षेत्रामध्ये सुमारे १० हजार ४०९ इतके मोकाट तर १ हजार ७५९ पाळीव श्वान असे १२ हजार ९६८ इतके श्वान आहेत. संस्थेमार्फत गेल्या तीन वर्षात ५ हजार ९५६ भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.