बदलापूर: बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरून स्थानिक पोलीस आणि शाळा प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात असतानाच आता शाळेने माफीनामा जाहीर केला आहे. याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे.

मंगळवारी सजग नागरिकांनी शाळेविरुद्ध आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना हा खटला फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी केली आहे. तर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी याप्रकरणी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. तर यात हलगर्जीपणा करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

हेही वाचा – “सामाजिक परिवर्तनात साहित्यिकांची भूमिका महत्वाची”, प्राध्यापक संतोष राणेंचं वक्तव्य

सबंधित संस्थेने जाहीर केलेल्या माफिनाम्यात या प्रकाराला तो दुर्दैवी, घृणास्पद आणि निंदनीय म्हटले आहे. या प्रकारानंतर सबंधित आरोपी विरुद्ध कारवाई करण्यासाठी पूर्ण क्षमतेने संस्थेने पोलिसांना सहकार्य केले. या घटनेनंतर सबंधित कर्मचाऱ्यावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी संस्थेचा आग्रह आहे, असे शाळेने निवेदनात म्हटले आहे. आरोपीची हकालपट्टी करण्यात आली असून ज्या खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून हा कर्मचारी कंत्राटी पद्धतीने संस्थेच्या सेवेत आला होता. त्या कंत्राटदार कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकून त्याचा करार रद्द केला आहे. तसेच हा प्रकार ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापिका यांना निलंबित करण्यात आल्याचेही संस्थेने सांगितले आहे. तसेच त्या वर्गाच्या वर्गशिक्षका, मुलांची ने आण सुरक्षितरित्या करण्याची जबाबदारी असणाऱ्या सेविका यांनाही सेवेमधून कमी करण्यात आले आहे. पूर्व प्राथमिक आणि शिशु वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या आणि सांभाळ करण्याच्या दृष्टीने फक्त महिलांचीच नेमणूक केली जाणार आहे. या प्रकरणात पालकांना झालेल्या मनस्तापाबद्दल संस्थेने त्यांची जाहीर माफी मागितली असून त्यांना कायदेशीर मदत देऊ केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व पालक, विद्यार्थी आणि शहरातील सजग नागरिकांना संस्थेने शांततेचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी संस्था तयार असल्याचेही संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल यांनी सांगितले आहे.

मंगळवारी आंदोलन

शहरातील विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष या प्रकरणात आक्रमक झाले असून त्यांनी मंगळवारी शाळा प्रशासनाविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

खटला फास्टट्रॅकवर चालवा

या प्रकरणावर मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकाराचा निषेध केला आहे. यातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे कथोरे यांनी सांगितले आहे. सोबतच या प्रकरणात पोलीस, शिक्षण संस्था आणि आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षावरही कारवाई करण्याची मागणी कथोरे यांनी केली आहे.

फाशीची शिक्षा द्या

तर हा निंदनीय प्रकार असून या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – टिटवाळ्यातील बेकायदा चाळी भुईसपाट

कठोर कारवाईचे आश्वासन

तर याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती दिली असून आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी संपर्क साधून योग्य त्या कडक कारवाईचे निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांनी दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलले

पालकांच्या तक्रारीची वेळीच दखल न घेतल्याचा आरोप बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्यावर होत होता. त्यानंतर याची दखल राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतल्यानंतर शितोळे यांची बदली करण्यात आली असून त्या जागी किरण बालवडकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.