बदलापूर : बदलापूर शहराच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर गुरुवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. पश्चिमेकडील दत्त चौकापासून ते पूर्वेतील आदर्श शाळा चौकापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही मीटरचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना तासनतास ताटकळत राहावे लागल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असताना येथील लाेकप्रतिनिधींनी मात्र या परिस्थितीकडे पुरते दुर्लक्ष केले. एरवी विकासकामांचे श्रेय मिळवण्यासाठी चढाओढ करणारे लोकप्रतिनिधी सामान्य नागरिक अडचणीत असताना कुठे गायब होतात, असा प्रश्न येथील त्रस्त नागरिकांनी विचारला.

बदलापूर शहराच्या पूर्व आणि पश्चिम प्रवासासाठी शहरात एकमेव उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलावर पावसाळ्यात सातत्याने खड्डे पडतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. शहरात दुपारी बाराच्या सुमारास पूर्व पश्चिम अशी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक होत असते. मात्र उड्डाणपूलावर गेल्या काही दिवसात होणाऱ्या कोंडीमुळे विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवास त्रासदायक ठरत आहे. बुधवारीही वाहतूक कोंडीचा फटका येथील रहदारीला बसला. शाळेत जाणाऱ्या आणि शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बस कोंडीत एकाच जागी अडकून पडल्या. रस्ता मोकळा नसल्याने रुग्णवाहिकाही कोंडींत अडकल्याचे दिसून आले.

पर्यायी मार्गही कोंडीत

पूर्व-पश्चिम जाण्यासाठी उड्डाणपुलाला एकमेव पर्यायी मार्ग असलेल्या बेलवली भुयारी मार्गाकडे अनेक वाहनचालकांनी आपला मोर्चा वळवला. मात्र, तिथेही वाहनांची मोठी गर्दी उसळल्याने बेलवली भुयारी मार्गातही वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था बदलापूरकरांची झाली होती.

खड्डे आणि बंद पडणाऱ्या वाहनांमुळे जीवघेणा प्रवास

उड्डाणपुलावर सातत्याने पडत असलेले जीवघेणे खड्डे आणि त्यातच अरुंद पुलावर बंद पडणारी वाहने यामुळे बदलापूर शहरातील पूर्व-पश्चिम प्रवास आता अक्षरशः त्रासदायक ठरू लागला आहे. वाहतुकीचा वेग मंदावत असल्याने साधे काही मीटरचे अंतर पार करण्यासाठी आता तासनतास लागत आहे. यामुळे नागरिकांचा बहुमूल्य वेळ रस्त्यावरच वाया जात आहे.

लोकप्रतिनिधींच्या कामाबाबत नागरिकांमध्ये संताप

शहरातील वाहतुकीचा एवढा बोजवारा उडालेला असताना, बदलापूरचे स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र २०२९ मध्ये पूर्ण होणाऱ्या नव्या उड्डाणपुलाच्या कामाचे श्रेय लाटण्यात आणि केवळ चमकोगिरी करण्यात मग्न असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला.

पुलाचे स्वप्न दाखवणाऱ्या या नेत्यांना सध्या अस्तित्वात असलेल्या एकमेव उड्डाणपुलावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीवर चकार शब्दही काढावासा वाटत नाही का? असा प्रश्न यावेळी नागरिकांनी विचारला.