भुयारी मार्गातील पाण्याचा केवळ खळखळाट

बदलापुरातील बेलवली परिसरातील रेल्वे पुलाखालील भुयारी मार्गाचे बांधकाम पूर्ण झाल्याच्या पहिल्या दिवसापासून पाण्याने तुंबलेलेच आहे.

बदलापुरातील बेलवली परिसरातील रेल्वे पुलाखालील भुयारी मार्गाचे बांधकाम पूर्ण झाल्याच्या पहिल्या दिवसापासून पाण्याने तुंबलेलेच आहे. या संदर्भात २१ जानेवारी रोजी ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे रेल्वे प्रशासन जागे झाले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी भुयाराची पाहणी केली. या वेळी मुख्याधिकारी देविदास पवार, अभियंते देशमुख उपस्थित होते.
अनेक दिवसांपासून भुयारी मार्ग बंद आहे. त्यामुळे बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागातील नागरिकांची गैरसोय होत होती. तसेच येथे असलेले रेल्वे फाटकही बंद करण्यात आले होते. याचा शाळकरी विद्यार्थी, रुग्ण तसेच येथे असलेल्या स्मशानात ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसत होता. रेल्वे व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी कळवूनही त्यांच्याकडून याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येत नव्हती.
बेलवली परिसरातील प्रेतयात्रा पश्चिमेकडून पूर्वेकडे नेणारा एकमेव मार्ग बंद झाल्याने नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे या परिसरातील नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे रेल्वेचे अभियंते देवेनकुमार यांनी या भुयाराची पाहणी केली; परंतु या अधिकाऱ्यांच्या भेटीचा कोणताही उपयोग झाला नसून ही समस्या सुटणे आता दुरापास्त झाले आहे.
याप्रश्नी आपली बाजू सावरण्यासाठी नगरपालिकेवर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न रेल्वे करत आहे. या भुयारी मार्गाच्या बाजूने नैसर्गिक नाल्याचा स्रोत असून त्या नाल्याच्या पातळीच्या खाली मार्ग बांधल्याने भुयारी मार्गात पाणी शिरत आहे; तसेच रेल्वे हद्दीतून नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेची पाइपलाइन जाण्यास रेल्वेने गेल्या चार वर्षांपासून परवानगी न दिल्याने येथे सांडपाणी साठत आहे.

‘पुराचे पाणी शिरणारच’
बदलापूर नगरपालिकेचे अभियंते देशमुख म्हणाले, की रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या सांडपाण्याचे कारण दिले आहे, मात्र त्यांनी नैसर्गिक नाल्याच्या पातळीपेक्षा खाली मार्ग बांधल्याने ही समस्या उद्भवली आहे. या रस्त्याची उंची ३ फुटांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव रेल्वेला सादर करण्याची सूचना रेल्वे अधिकाऱ्यांनी पालिकेला केली आहे; मात्र उंची वाढवूनही पावसाळ्यात येथे पुराचे पाणी शिरणारच आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबून हा मार्ग पुन्हा बंद होणार आहे. तसेच हा मार्ग अरुंद असल्याने येथे वाहतुकीची कोंडी होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Badlapur train subway shutting down first day after waterlogged

ताज्या बातम्या