बदलापूर: उरण ते बडोदे या बहुचर्चित आणि सद्यस्थितीत काम सुरू असलेल्या द्रुतगती महामार्गावरील बोगद्यातून प्रवास करणे एका कुटुंबाच्या जीवावर बेतले आहे. बदलापूरजवळील या निर्माणाधीन बोगद्यात रविवारी कार उलटून झालेल्या भीषण अपघातात बदलापूरमधील एका ३६ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

कुळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बदलापूर पूर्व परिसरात राहणारे हे पाच जणांचे कुटुंब रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कारने बाहेर पडले होते. पती, पत्नी आणि तीन मुलांचा या कारमध्ये समावेश होता. फिरण्यासाठी ते उरण-बडोदा महामार्गाच्या बदलापूरजवळील बोगद्यात गेले असता, अंधार आणि अपूर्ण रस्त्यामुळे मातीच्या ढिगाऱ्यावरून त्यांची कार अचानक उलटली. या भीषण अपघातात ३६ वर्षीय पत्नी गंभीर जखमी झाली आणि दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. सुदैवाने कुटुंबातील इतरांचे प्राण वाचले असले, तरी सुट्टीच्या आनंदावर विरजण पडून या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून उरण ते बडोदा या द्रुतगती महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी, काही ठिकाणी कामे अपूर्ण असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी अद्याप अधिकृतरीत्या खुला करण्यात आलेला नाही. मात्र, या बोगद्यातून बदलापूरहून पनवेल शहरात अवघ्या २० मिनिटांत पोहोचता येते, अशा आशयाचे अनेक दिशाभूल करणारे व्हिडिओ आणि चित्रफिती सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहेत.

हे व्हिडिओ पाहून अनेक नागरिक नियम मोडून या धोकादायक बोगद्यातून प्रवास करण्याचा जीवघेणा प्रयत्न करत आहेत. सध्या या बोगद्यात काम सुरू असल्याने तिथे प्रचंड अंधार असतो आणि रस्ताही अपूर्ण आहे. या धोक्याची कल्पना नसताना प्रवास केल्यानेच या महिलेचा नाहक बळी गेला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास बदलापूर ग्रामीण पोलीस करत आहेत. अशा अपूर्ण आणि बंद असलेल्या मार्गांवरून नागरिकांनी प्रवास टाळावा, असे आवाहन आता केले जात आहे.