बदलापूर: ठाणे जिल्ह्यात आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून जनजीवनावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. सोमवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीची पाणी पातळी १५.३१ मीटर इतकी नोंदवली गेली आहे. पाण्याच्या या वाढत्या पातळीमुळे दहागाव ते बदलापूरकडे जाणारा बारवी नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून, सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. याचप्रमाणे, कल्याण तालुक्यातील टिटवाळा-फळेगाव रस्त्यावरील रुंदे पूल देखील आज पहाटे ५ वाजल्यापासून पाण्याखाली गेल्याने हा पूलही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

उल्हास नदीच्या आसपासच्या क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीची धोक्याची पाणी पातळी १७.५० मीटर इतकी आहे. तर इशारा पातळी १६.५० मीटर इतकी आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजता उल्हास नदीची बदलापूर शहरातील पाणी पातळी १५.३१ मीटर इतकी होती.

एकीकडे नद्यांच्या पातळीत वाढ होत असताना, दुसरीकडे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाच्या पाणीपातळीतही मुसळधार पावसामुळे मोठी वाढ झाली आहे. एमआयडीसीने सोमवारी सकाळी ७ वाजता दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार, धरण क्षेत्रात गेल्या २४ तासांत तब्बल १७०.८० मिलीमीटर इतक्या दमदार पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणाची पाणीपातळी आता ७१.४३ मीटरवर पोहोचली असून धरण पूर्ण भरण्याच्या (ओव्हरफ्लो पातळी ७२.६० मीटर) अगदी जवळ आले आहे. सध्या धरणात ३०२.४४ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा जमा झाला असून, हे प्रमाण एकूण क्षमतेच्या ८९.२६ टक्के इतके झाले आहे. या मुसळधार पावसामुळे यंदाच्या हंगामातील एकूण पावसाची नोंद आता २१५९.२० मिलीमीटर इतकी झाली आहे.

सध्या धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा जमा झाला असला तरी, गेल्या वर्षीच्या याच दिवसाच्या आकडेवारीशी तुलना केल्यास काहीशी तफावत दिसून येते. गेल्या वर्षी ३ ऑगस्ट २०२५ रोजी धरण क्षेत्रात १९५८.०० मिलीमीटर पाऊस झाला होता, मात्र धरणाची पातळी ७२.११ मीटरवर होती. त्यावेळी धरणात तब्बल ३२१.७३ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ९४.९५ टक्के पाणीसाठा होता. म्हणजेच, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरण क्षेत्रात अधिक पाऊस पडूनही धरणातील पाणीसाठा मात्र जवळपास साडेपाच टक्क्यांनी कमी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

जिल्ह्यातील पाऊस व जलस्थितीचा संक्षिप्त आढावा

तालुकानिहाय २४ तासांतील पाऊस (मिमी): ठाणे- १२९.०, मिरा-भाईंदर- ८९.०, कल्याण- १०७.०, मुरबाड- १२२.०, भिवंडी- १२४.०, शहापूर- ७२.०, उल्हासनगर- १२९.०, अंबरनाथ- १०२.० (जिल्हा सरासरी- १०९.२५).

नद्यांची पाणीपातळी: उल्हास नदीने जांभूळपाडा येथे १३.५० मीटर गाठत आपली इशारा पातळी (१३.०० मीटर) ओलांडली आहे. तर, मोहने येथे उल्हास (८.०० मीटर), टिटवाळा येथे काळू (१०१.५० मीटर) आणि सापगाव येथे भातसा नदीची (३२.०० मीटर) पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.

धरणांचा पाणीसाठा आणि विसर्ग: मोडक सागर धरण १०० टक्के भरले असून त्यातून ३२८.४८ क्युमेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तानसा धरणात ९९.५८ टक्के साठा असून ३१२.९८ क्युमेक्स विसर्ग सुरू आहे. तसेच, भातसा धरणात ९१.१९ टक्के साठा जमा झाला असून तिथून ३०४.१४५ क्युमेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.