बदलापूर: सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे बदलापूर शहरात पुराचे संकट अधिक गडद झाले. पावसाचा जोर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी यामुळे उल्हास नदीची पाणीपातळी १७.५७ मीटरवर पोहोचली होती. धोक्याची पातळी (१७.५० मीटर) ओलांडून नदीचे पाणी शहरात आणि सखल भागात शिरण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली.
शहरात पाणी शिरू लागल्याची माहिती मिळताच नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांची मोठी धांदल उडाली. पुराचे पाणी इमारतींच्या आवारात आणि पार्किंगमध्ये शिरण्याच्या भीतीने अनेकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या पार्किंगमध्ये न ठेवता शहरातील उंच आणि सुरक्षित ठिकाणी नेऊन उभ्या केल्या आहेत. याशिवाय, ज्या इमारतींमध्ये पाणी शिरण्याचा सर्वाधिक धोका आहे, तेथील तळमजल्यावरील रहिवाशांनी सामानासह तातडीने वरच्या मजल्यांवर आणि नातेवाईकांकडे स्थलांतर करण्यास सुरुवात केली.
दुपारी १२ वाजता बदलापूरमध्ये उल्हास नदीची पातळी १७.५५ मीटरवर होती. मात्र, कर्जत आणि माथेरानच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्याने अवघ्या काही तासांतच, म्हणजेच सायंकाळी ४ वाजेपर्यंत नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होऊन ती १७.५७ मीटरवर पोहोचली.
गेल्या २४ तासात बदलापूर शहरात १३४ मिलीमिटर पावसाची नोंद कऱण्यात आल्याची माहिती तहसिलदार अमित पुरी यांनी दिली. तर उल्हासनदीची पातळी आणखी वाढल्याने नागरीकांना नदी परिसरात न फिरण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच यावेळी उल्हासनदीच्या पाणी पातळीचा आढावा घेण्यासह पुरस्थिती उद्भवल्यास वैद्यकीय व्यवस्थेसह जवळपास १२ हजार नागरीकांच्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था पालिकेकडून करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी दिली.
केवळ बदलापूरच नाही, तर कल्याण ग्रामीण भागातही परिस्थिती चिंताजनक होती. जांभूळपाडा येथेही उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली, मोहने येथे नदी इशारा पातळीच्या वर वाहत होती. वाढत्या पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणांना सज्ज केले असून, नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आणि सुरक्षित स्थळीच राहण्याचे आवाहन करण्यात आले. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात होते.
पाणीपुरवठ्यावर परिणाम
उल्हास नदीची पाणी पातळी तीन वाजण्याच्या सुमारास धोका पातळीच्या वर पोहोचली होती. उल्हास नदीवर असलेल्या बॅरेज बंधाऱ्यातून पाणी उचलून बदलापूर, अंबरनाथ या शहरांना पुरवले जाते. मात्र धोका पातळीवर पाणी गेल्यानंतर येथील यंत्रणेच्या कामावर परिणाम होतो. त्यामुळे पाण्याच्या शुद्धीकरण क्षमतेतही परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर अधिक पाणी वाढल्यास कर्मचाऱ्यांना तेथून सुखरूप बाहेर काढावे लागते. अशा परिस्थितीत पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले. पाण्याची गढूळता वाढली असून यंत्रणेत पाणी गेल्याने स्वच्छता करावी लागणार असल्यानेही पाणी पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो अशी माहिती कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांनी माध्यमांना दिली.
रहिवाशांचे स्थलांतर
उल्हास नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे दुपारी १२ च्या सुमारास या भागातील स्वाभिमान नगर आणि आसपासच्या परिसरातील सखल भागातील रहिवाशांनी सोनिवली येथील बीएसयुपी संकुलामध्ये हलवले. त्यांच्या जेवणारी व्यवस्था कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी दिली. पश्चिमेतील हेंद्रेपाडा आणि आसपासच्या परिसरातील तळमजल्यावरील नागरिकांनी त्याच इमारतीतील वरच्या मजल्यावर आसरा घेतला होता. अशा सर्व रहिवाशांची व्यवस्था रहिवाशांनी केली. तर अग्नीशमन दल, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग सज्ज असल्याची माहिती नगराध्यक्षा घोरपडे यांनी दिली.
शहरात ठिकठिकाणी पाणी
बदलापूर शहरातील पूर्व भागात असलेल्या कात्रप रस्त्यावर आज पुन्हा पाणी साचले. येथील पाण्याचा निचरा होण्याची यंत्रणा कोलमडल्याने गेल्या काही दिवसांपासून येथे सातत्याने पाणी साचते आहे. प्रस्तावित पनवेल मार्गावरही विविध ठिकाणी पाणी साचले होते. पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळचा भुयारी मार्ग पाण्याखाली गेला होता. शाळांना सुट्टी असल्याने उड्डाणपुलावर अधिक कोंडी झाली नाही. पश्चिमेतील शनिनगर, मांजर्लीतील गौरी हॉल परिसरात काही अंशी रस्त्यावर पाणी आले होते.
कुंडेश्वर येथून पर्यटकांची सुटका
रविवारी सायंकाळी कुंडेश्वर येथे पर्यटनासाठी गेलेल्या सात तरूणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले. पाण्याची पातळी वाढल्याने नैसर्गिक प्रवाह ओलांडण्यात त्यांना अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांनी स्थानिकांच्या मदतीने अग्नीशमन दलाच्या जवानांना पाचारण केले.
