बदलापूर: रायगड आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर, विशेषतः माथेरान, कर्जत आणि भीमाशंकर परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे ठाणे जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे. या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून, बदलापूर आणि कल्याण ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रायगड आणि ठाणे जिल्ह्यात मागील २४ तासांत पावसाने अक्षरशः हाहाकार उडवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार माथेरानमध्ये सर्वाधिक आणि विक्रमी ४०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ कर्जतमध्ये २९१ मिमी, बदलापूर शहरात २३८ मिमी, तर भीमाशंकर येथे २३७ मिमी पाऊस बरसला आहे. भौगोलिकदृष्ट्या माथेरान, कर्जत आणि भीमाशंकर या उंचावरील भागात जोरदार पाऊस झाल्यास त्याचे सर्व पाणी वेगाने उल्हास नदीच्या पात्रात येते.

येथून वाहणाऱ्या पोशिर आणि चिल्हार नदी उल्हास नदीला येऊन मिळते. या नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने नदीच्या पाणी पातळी वाढली. त्यामुळे काल रात्रीपासूनच उल्हास नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत होती. रात्रीच्या वेळी पाण्याची पातळी वाढत गेल्याने नदीकाठच्या भागात चिंतेचे आणि तणावाचे वातावरण होते.

उल्हास नदी इशारा पातळीकडे

रविवार सकाळी १० वाजेपर्यंत बदलापूर येथे उल्हास नदीची पाणी पातळी १४.६५ मीटरवर पोहोचली होती. उल्हास नदीची इशारा पातळी १६.५० मीटर तर धोक्याची पातळी १७.५० मीटर निश्चित करण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नदी लवकरच इशारा आणि त्यानंतर धोक्याची पातळी ओलांडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे. यापूर्वीही अनेकदा बदलापूर शहरात पाऊस नसताना कर्जत, माथेरान येथे झालेल्या पावसामुळे बदलापुरात पूरस्थिती निर्माण झाली होती.

बारवी धरण क्षेत्रात मोठा दिलासा

एकीकडे उल्हास नदीने धोक्याची घंटा वाजवली असली तरी, या मुसळधार पावसाचा मोठा फायदा बदलापूर, अंबरनाथ आणि ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाला झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने ३० जून रोजी धरणातील साठा २१.७४ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. मात्र, या हंगामातल्या पहिल्याच मोठ्या पावसामुळे धरणाला नवसंजीवनी मिळाली आहे.

रविवार, ५ जुलैच्या आकडेवारीनुसार, बारवी धरण क्षेत्रात एका दिवसात १६२.४० मिलिमीटर दमदार पावसाची नोंद झाली असून पाणीसाठा थेट २६.३५ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणाची पाणीपातळी आता ५९.०५ मीटर झाली आहे. एकूणच, घाटमाथ्यावरील पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटण्याच्या मार्गावर असला तरी, उल्हास नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे प्रशासनासह नागरिकांना आता अत्यंत सतर्क राहावे लागणार आहे.