बदलापूर: उल्हास नदीच्या उगम क्षेत्रात आणि सह्याद्रीच्या रांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूरकरांची धाकधूक पुन्हा एकदा वाढली. बुधवारी संपूर्ण दिवसभर उल्हास नदीची पाणी पातळी १७ मीटरच्या खाली न आल्याने सखल भागात पाणी शिरले, पूरस्थितीचे सावट कायम होते. याच तणावपूर्ण वातावरणात एका महिलेने नदीच्या पुलावरून थेट पुराच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली.
गेल्या काही दिवसांपासून आहुपे, भीमाशंकर, माथेरान, कर्जत आणि लोणावळा-खंडाळा पट्ट्यात होत असलेल्या विक्रमी पावसामुळे उल्हास नदीला मोठा पूर आला आहे. बुधवारी सकाळी नदीची पाणी पातळी १७ मीटरवर पोहोचली होती. पावसाचा जोर कायम असल्याने आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याचे लोंढे येत असल्याने, सायंकाळी ४ वाजता ही पातळी १७.२७ मीटर इतकी नोंदवली गेली.
नदीची इशारा पातळी १६.५० मीटर तर धोक्याची पातळी १७.५० मीटर आहे. चिंताजनक बाब म्हणजे, संपूर्ण दिवसभरात नदीचे पाणी १७ मीटरच्या खाली आलेच नाही. सतत वाढणाऱ्या या पाणी पातळीमुळे नदीकाठच्या आणि सखल भागातील वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले. यामुळे नागरिकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली असून, अनेकांची सुरक्षित स्थळी जाण्यासाठी तारांबळ उडाली.
पुराच्या पाण्यात महिलेची उडी
एकीकडे नदीला महापूर आलेला असताना आणि प्रशासन नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत असतानाच, बुधवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. एका अज्ञात महिलेने बदलापूर येथील उल्हास नदीवरील पुलावरून थेट पुराच्या उसळत्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महिलेला वाचवण्याचा आणि तिचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र पुराच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आणि रौद्र असल्याने महिलेचा शोध घेण्यात बचाव पथकाला यश आले नाही. पावसाच्या पाण्यामुळे महिलेची ओळख पटवणे पोलिसांसाठी कठीण झाले आहे.
पुलावर जाण्यास नागरिकांना मज्जाव
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल केल्याने सद्यस्थितीत नदीचा प्रवाह अत्यंत रौद्ररूप धारण केले होते. अशा वेळी पुलावर आणि नदीकिनारी नागरिकांचा वावर अत्यंत धोकादायक ठरू शकतो. महिलेने उडी मारल्याच्या या दुर्दैवी घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत, उल्हास नदीवरील पुलावर नागरिकांना जाण्यास आणि बघ्यांची गर्दी करण्यास सक्त मनाई केली. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी तिथे कडक बंदोबस्त ठेवला असून, सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणीच थांबण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
