बदलापूर: गेल्या काही दिवसापासून सुरू झालेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाण्याची गढूळता वाढली असल्याने शहरात जलजन्य आजारांचा प्रसार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच गाळून आणि पाणी उकळून प्यावे, असे जाहीर आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जल व्यवस्थापन उपविभागातर्फे करण्यात आले आहे.

बदलापूर शहराला उल्हास नदीतून पाणी पुरवठा केला जातो. उल्हास नदीवर असलेल्या बॅरेज बंधाऱ्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाण्याची उचल केली जाते. त्यावर जलशुद्धीकरण प्रकल्पात प्रक्रिया करून ते पाणी बदलापूर, अंबरनाथ या शहरांना पुरवले जाते. मात्र पावसाळा सुरू होताच मोठ्या प्रमाणावर माती वाहून आल्याने उल्हास नदीचे पाणी गढूळ होत असते. या गढुळ होण्याचे प्रमाण इतके असते की त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केल्यानंतरही पाण्याचा रंग गढूळच दिसतो. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरूवातीला काही दिवस बदलापुरकरांना गढूळ पाण्याचा वापर करावा लागतो.

गेल्या काही दिवसांपासून पावसाला संथगतीने का होईना सुरूवात झालेली आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याचा रंग पुन्हा बदलला असून गढूळ पाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरणाकडून हे पाणी गाळून त्यावर आवश्यक ती रासायनिक प्रक्रिया करूनच शहरात पुरवले जाते. तरीही, नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून अधिक खबरदारीचा उपाय म्हणून घरी आलेले पाणी गाळून आणि उकळूनच पिण्यासाठी वापरावे, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.

सोबतच, नागरिकांनी आपल्या घरगुती नळजोडण्यांबाबतही सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः नागरिकांनी आपली पाण्याची नळजोडणी गटार भागातून किंवा सांडपाण्याच्या प्रवाहातून जात नसल्याची जातीने खात्री करावी. जर अशी जोडणी गटारीतून जात असल्याचे आढळल्यास, ती त्वरित तेथून काढून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी, असे आवाहन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे. जल वाहिनीला कुठेही गळती होत असल्यास वाहिनी तात्काळ बदलून ती गळती थांबवावी, जेणेकरून पिण्याच्या पाण्यात दूषित घटक मिसळणार नाहीत.

यासोबतच, शहरातील बहुमजली इमारतींमधील रहिवाशांनी आपल्या पाण्याच्या साठवण टाक्यांची योग्य प्रकारे स्वच्छता करावी आणि सर्व नळधारकांनी आपल्या नळजोडणीवरील मीटरची जाळी नियमितपणे साफ करून घ्यावी, अशा सूचनाही प्राधिकरणाने केल्या आहेत.

गळती दिसल्यास तक्रार करा

दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीवर कुठेही गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा शहरात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार असल्यास नागरिकांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधावा, यासाठी प्राधिकरणाने भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. बदलापूर पूर्व – करण राठोड ९०४९१८१५५९, बदलापूर पश्चिम – आशिष सातपुते ८०९७६६९१४९ या क्रमांकावर संपर्क साधावा. याव्यतिरिक्त मदतीसाठी एजन्सीचा ७३८७७०४२६० हा संपर्क क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.