बदलापूर: उल्हास नदीच्या उगम क्षेत्रात आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता प्राप्त आकडेवारीनुसार, उल्हास नदीची पाणी पातळी १७ मीटरवर पोहोचली आहे. नदीने आपली १६.५० मीटरची इशारा पातळी ओलांडली असून, आता ती १७.५० मीटर या धोक्याच्या पातळीकडे वेगाने सरकत आहे. त्यामुळे बदलापूर शहरासह कल्याण ग्रामीण भागाला पुन्हा एकदा पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कर्जत, माथेरान, आहुपे, भीमाशंकर, लोणावळा आणि खंडाळा या घाटमाथ्यावरील मुख्य पाणलोट क्षेत्रात पावसाने अक्षरशः हाहाकार उडवला आहे. या मुसळधार पावसाचे पाणी प्रचंड वेगाने उल्हास नदीच्या पात्रात मिसळत असल्याने नदीची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यात बदलापूर, शहरात अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातही मोठा पाऊस पडतो आहे.

सोमवारी नदीने धोक्याची पातळी (१७.५० मीटर) ओलांडल्यानंतर काल पाण्याची पातळी १२ मीटर पर्यंत खाली आली होती. मात्र, रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे आज सकाळी आठ वाजताच नदीची पातळी १७ मीटरवर जाऊन पोहोचली आहे. पाणी पातळीत सातत्याने होत असलेल्या या वाढीमुळे बदलापूर शहरातील सखल भागात आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.

सोमवारी शहरात पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. आता पुन्हा पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांनी धसका घेतला आहे. केवळ बदलापूरच नव्हे, तर प्रवाहाच्या खालच्या दिशेने असलेल्या कल्याण ग्रामीण भागातील जांभूळपाडा आणि परिसरालाही या वाढत्या पाण्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे महसूल, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर आली आहे. नदीकाठच्या गावांना आणि सखल भागातील रहिवाशांना तातडीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, वाढत्या पाणी पातळीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.