बदलापूर : उल्हास नदी दुथडी भरून वाहत असतानाही तांत्रिक कारणे पुढे करीत बदलापूरकरांवर लादलेली पाणीकपात अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने रद्द केली. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कुळगाव-बदलापूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जल व्यवस्थापन उपविभागाचे उपविभागीय अधिकारी एस. एस. खाद्री यांनी ३१ जुलै रोजी काढलेल्या एका अधिकृत परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. याचा फायदा अंबरनाथकरांनाही होणार असून येथील पाणीकपातही रद्द होण्याची आशा आहे.

मुख्यमंत्री व राज्य शासनाच्या सूचनेनुसार ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आले होते. याच सूचनेची अंमलबजावणी करत, १ मे २०२६ पासून पुढील चार महिने म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत शहराच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात लागू करण्यात आली होती. यानुसार बदलापूर शहरात चक्राकार पद्धतीने आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केली जात होती. त्याचा फटका नागरिकांना दोन दिवस बसत होता.

मात्र, जूनच्या अखेरीस व जुलैमध्ये बदलापूर व धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाला. उल्हास नदीची पाणीपातळी वाढून ती दुथडी भरून वाहू लागली होती. नदीत मुबलक पाणी उपलब्ध झाल्याचे पाहून एमआयडीसीने जिल्ह्यासाठी लागू केलेली ४८ तासांची पाणीकपात तातडीने रद्द केली होती. परंतु, याच काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आंध्रा धरणातून पाणी सोडले जात नसल्याचा दावा करत आपली पाणीकपात कायम ठेवली होती.

१ जुलैपासून उल्हास नदी अनेकदा इशारा पातळीवरून, कधी धोका पातळीवरून वाहत होती. मात्र असे असतानाही, आम्हाला पाणी का मिळत नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला होता. नागरिकांच्या या संतापाला वाचा फोडत ‘लोकसत्ता’ने उल्हास नदी दुथडी भरून वाहत असतानाही बदलापूरकर तहानलेलेच या मथळ्याखाली सविस्तर वृत्त देऊन प्राधिकरणाच्या या अजब दाव्याचे वाभाडे काढले होते.

अखेर नागरिकांचा वाढता रोष व पावसाची सद्यस्थिती पाहता प्राधिकरणाने आपला निर्णय बदलला आहे. सद्यस्थितीत पावसाचे प्रमाण चांगले असून पाण्याच्या पातळीतही पुरेशी वाढ झाल्याने ही पाणीकपात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आता रद्द करण्यात येत असल्याचे नव्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.