बदलापूर: शहरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलत बदलापूरमध्ये दामिनी पथक स्थापन करण्यात आले आहे. महिलांना तात्काळ मदत मिळावी, शहरात गस्त वाढवावी आणि महिलांवरील गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवता यावे या उद्देशाने या पथकाची स्थापना करण्यात आली आहे. वेगाने वाढणाऱ्या बदलापूर शहरासाठी अशा पथकाची मागणी नागरिकांकडून अनेक वर्षांपासून होत होती.
बदलापूर शहरात गेल्या काही महिन्यात शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या दरम्यान त्यांची सुरक्षा ठोस असावी यासाठी अनेक नियमावली आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले होते. महिला अत्याचाराच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच महिलांना तत्काळ प्रतिसाद मिळावा, समाजकंटकांवर वाचक ठेवण्यासाठी शहरात दामिनी पथकाची स्थापना व्हावी अशी मागणी होती. त्यानुसार नुकतीच दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली होती.
या उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मंत्री आशिष दामले यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ स्वतःच्या खर्चातून दामिनी पथकासाठी दोन दुचाकी (स्कुटी) उपलब्ध करून दिल्या आहेत. या स्कुटींच्या माध्यमातून पथकाला शहरातील विविध भागात जलद गतीने गस्त घालणे, महिलांच्या तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद देणे आणि गरज पडल्यास त्वरित मदत पोहोचवणे अधिक सोपे होणार आहे. शुक्रवारी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा प्रियंका दामले, परिमंडळ चारचे पोलिस उप आयुक्त सचिन होते, सहायक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या उपस्थितीत या दोन वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमासाठी मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे तसेच ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.
प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रभाकर पाटील, संगीता चेंदवणकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. महिलांच्या सुरक्षिततेसाठी उचललेले हे पाऊल बदलापूर शहरासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून सुरक्षित बदलापूर घडविण्याच्या दिशेने हा सकारात्मक आणि ठोस प्रयत्न असल्याचे मत यावेळी उपनगराध्यक्ष प्रियांका दामले यांनी व्यक्त केले.
